Health News : अन्नापासून होणारी अॅलर्जी (Allergy) ही काही असामान्य गोष्ट नाही. विशेषतः थंडीत लोक यथेच्छ खातात आणि शारीरिक हालचाल आणि व्यायाम कमी करतात. सर्वसाधारणपणे अॅलर्जी म्हणजे काही विशिष्ट खाद्य पदार्थांच्या बाबतीत शरीराची काही विशिष्ट प्रतिक्रिया. आयजीई (IgE) अॅंटीबॉडीज अन्नाशी प्रतिक्रिया करतात आणि त्यामुळे हिस्टामिन उत्पन्न होते आणि मग तुमच्या मुलाच्या अंगावर पित्त उठणे, तोंडाला खाज सुटणे, दमा, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात गडबड होणे, श्वासात घरघर येणे, रक्तदाब कमी होणे उलट्या होणे किंवा अतिसार वगैरे शारीरिक लक्षणे दिसू लागतात. फूड अॅलर्जीमुळे उद्भवणार्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या प्रतिक्रियेमुळे तुमच्या मुलात काही लक्षणे दिसू लागतात, जी त्रासदायक असतात किंवा कधी कधी घातक देखील ठरु शकतात.
डॉ. प्रियंका उडावत-पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट, यांच्या मते गहू, दुधाचे पदार्थ, शेंगदाणे, सोया आणि नट्स हे लहान मुलांमध्ये अॅलर्जी निर्माण करणारे सामान्य पदार्थ आहेत तर बर्याचदा नट्स, मासे आणि शेलफिश यांच्यामुळे खूप गंभीर आणि वेदनादायक प्रतिक्रिया होऊ शकते.
पाच वर्षाखालील 5 टक्के मुलांमध्ये अॅलर्जी असल्याचे दिसते. 1997 ते 2007 दरम्यान 18 वर्षांखालील मुलांमध्ये फूड अॅलर्जीचे (Food Allergy) प्रमाण 18 टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे. मासे, शेलफिश, नट्स आणि शेंगदाणे यांच्या अॅलर्जीवर बहुतांशी मुले मात करु शकत नाहीत, उलट आयुष्यभर त्यांना ही अॅलर्जी राहते. असे आढळून आले आहे की, प्रत्येक मुलात वेगवेगळी लक्षणे असतात.
राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेनुसार, ज्यांना खूप तीव्र अॅलर्जी असते, त्यांना अशी तीव्र अॅलर्जी दिसण्यासाठी अगदी थोडासा खाद्यपदार्थ खाल्ल तरी त्यांना अॅलर्जी होऊ शकते.
उपचार आणि देखभाल
सामान्यपणे फूड अॅलर्जीचा प्रतिबंध किंवा उपचार औषधांनी केला जात नाही. ज्या पदार्थांमुळे लक्षणे दिसतात, ते पदार्थ टाळणे हाच उपचाराचा मुख्य उद्देश असतो. हे खाद्य पदार्थ आणि त्याच अन्न समूहातील इतर तत्सम अन्य पदार्थ टाळणे हेच महत्त्वाचे असते. ज्या महिला आपल्या मुलांना स्तनपान देत असतात, त्यांनी असे खाद्य पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे, तुम्ही तो पदार्थ थोडा तरी खाल्लात तरी तुमच्या दुधावाटे तुमच्या शिशुमध्ये त्याची अलर्जिक प्रतिक्रिया दिसू शकते. डॉक्टर एपिनेफ्रिनची किट तुम्हाला देऊ शकतात. हे औषध तीव्र फूड अॅलर्जी झाल्यास तीव्र प्रतिक्रियेची लक्षणे थांबवू शकते.
तीन ते सहा महिन्यांनंतर, तोच पदार्थ मुलांना देऊन बघितला तर त्या अॅलर्जीवर त्यांनी मात केली आहे का ते कळू शकते. मूल तीन ते चार वर्षांचे झाल्यावर ते अन्न कदाचित त्यांचे शरीर सोसू शकते. अशा प्रकारे लहानपणीच्या अनेक अॅलर्जी तात्पुरत्या असतात.
सामान्यतः लहान मुले आणि शिशुंमध्ये दूध आणि सोयाची अॅलर्जी असल्याचे दिसून येते. ही लक्षणे अशी असू शकतात:
• चिडचिड (किरकिर करणारे मूल)
• मुलाच्या शी मध्ये रक्त.
• वाढ व्यवस्थित न होणे .
• नवजात शिशुमध्ये दिसणारी अॅलर्जी जरी टाळता येणे शक्य नसले, तरी काही प्रतिबंधात्मक उपाय करुन तिची वारंवारिता कमी करता येऊ शकते.
• शक्य असल्यास पहिले सहा महिने आपल्या बाळाला स्तनपान द्या. बाळ किमान सहा महिन्याचे होईपर्यंत त्याला घन (सॉलिड) आहार देऊ नका.
• मूल एक वर्षाचे होईपर्यंत गाईचे दूध, गहू, अंडी, शेंगदाणे आणि सीफूड पासून दूर राहा.
फूड अॅलर्जीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दलच्या टिप्स:
• रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपण जे पदार्थ खातो, त्यात काय काय घटक पदार्थ आहेत हे जाणून घ्या. शक्य असेल तेव्हा रेस्टॉरंटमधून मेनू कार्ड आधीच घेऊन ठेवा आणि तेथे काय काय मिळते हे नीट तपासा.
• जेवण वाढणारा असेल, त्याला आपल्या मुलाच्या फूड अॅलर्जीबद्दल आवश्य सांगा. त्याला प्रत्येक डिश कशी बनवतात आणि त्यात काय काय घटक पदार्थ असतात हे माहित असते. ऑर्डर करण्यापूर्वी डिश बनवण्याची रीत आणि त्यातील घटक पदार्थ याविषयी जरुर विचारा.
• बुफे पद्धतीचे किंवा एकाच ताटातून अनेकांनी वाढून घेण्याची, जेवण्याची पद्धत टाळा कारण, अनेक जेवणांसाठी तीच तीच भांडी वापरल्याने अन्न दूषित होण्याची शक्यता असते.
• तळलेले पदार्थ खाण्याचे टाळा कारण एकाच तेलात वेगवेगळे पदार्थ तळलेले असू शकतात.
- डॉ. प्रियंका उडावत- पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट नारायण हेल्थद्वारा संचालित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.