Health News : बदलती जीवनशैली, पर्यावरणीय बदल, तणाव, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), गर्भधारणेचे वाढते वय, धूम्रपान आणि अपुरी झोप अशा विविध कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय इतिहास आणि अनुवांशिक परिस्थिती यांसारख्या घटकांमुळे वंध्यत्वावर परिणाम होऊ शकतो. आयव्हीएफ (IVF), किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन, हा एक असा प्रजनन उपचार पर्याय आहे ज्यामुळे असंख्य जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न साकार करता येते. या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानामध्ये स्त्रीबीज आणि पतीचे शुक्राणू हे प्रयोगशाळेत फलित एक भ्रूण तयार करतात आणि स्त्रीला गर्भधारणेस मदत करतात. पालकत्वाची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ हा एक उत्तम पर्याय आहे. भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या हा एक आव्हानात्मक प्रवास असू शकतो. याबाबत पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील डॉ. सुप्रिया पुराणिक, संचालक, 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग यांनी अधिक माहिती दिली आहे.


आयव्हीएफ उपचारादरम्यान कोणत्या गोष्टींचे पालन कराल? 


सकारात्मक राहा : सकारात्मक मानसिकता ठेवल्याने प्रक्रियेच्या परिणामांवर खूप चांगले परिणाम होऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जे रुग्ण आशावादी वृत्तीने आणि सकारात्मकरित्या आयव्हीएफकडे वळतात त्यांचा यशाचा दर अधिक असतो. 


दातांच्या आरोग्याकडे लक्ष द्या : हिरड्यांचे रोग, जळजळ जी संपूर्ण शरीरात पसरते आणि गर्भधारणेत अडथळा आणते. आयव्हीएफ उपचारादरम्यान मौखिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे नियमित तपासणी करणे आणि योग्य ब्रशिंग आणि फ्लॉसिंग तंत्रांचा सराव करणे आवश्यक आहे. शरीरातील मल्टीविटामिन्सच्या कमतरतेवर उपचार करणे देखील आवश्यक आहे.


तणाव कमी करा : प्रजनन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक हार्मोन्सवर तणावाचा परिणाम होतो. पुरुष आणि स्त्रियांमधील प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तणावापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. तणावाची पातळी कमी करण्यासाठी ध्यान आणि योगासारख्या विश्रांती तंत्रांचा स्वीकार करा.


योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणे तसेच वजन नियंत्रणात राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. कार्बोहायड्रेटसचे प्रमाण मर्यादित करणे, प्रथिनयुक्त आहार निवडणे गरजेचे आहे. जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळा.


योग्य आयव्हीएफ केंद्राची निवड करा, दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करा, दररोज आठ तासांची पुरेशी झोप घ्या.


'या' गोष्टी टाळाव्यात 


तुमचे आयव्हीएफ चक्र सुरु करण्यापूर्वी केसांना रासायनिक रंग लावू नका : केसांच्या रंगात अशी काही रसायने असतात जी हानिकारक ठरु शकतात कारण ते टाळूद्वारे शोषून घेतले जाण्याची आणि रक्तप्रवाहावाटे प्रवेश करण्याची क्षमता असते. ही संप्रेरक पातळी व्यत्यय आणू शकते आणि यशस्वी आयव्हीएफ सायकलसाठी आवश्यक संतुलनात अडथळे निर्माण करु शकते.


धुम्रपान तसेच मद्यपान टाळा : असे केल्याने या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.


कॅफिनयुक्त पेये टाळा : कॅफिन हे उत्तेजक म्हणून कार्य करते, ज्यामुळे मज्जासंस्था आणि प्रजनन प्रणालीसंबंधीत अवयवांवर परिणाम होतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॅफीनचे जास्त सेवन केल्याने प्रजननक्षमतेत अडथळा येतो आणि आयव्ही उपचारादरम्यान यशस्वी रोपणाची शक्यता कमी होते.प्रक्रिया केलेले अन्न, फ्रोजन फूडचे सेवन टाळा, इंजेक्शन्सच्या वेळा चूकवू नका आणि मेडिटेशन करायला विसरु नका.