Health News : बरेचदा सुट्टी अथवा सणासुदीला मुलांच्या आहारात साखरेचे (Sugar) सेवन जास्त प्रमाणात तर होत नाही ना याबाबत एक पालक म्हणून सतर्क असणे गरजेचे आहे. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे की जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर किंवा तज्ञ साखरेबद्दल आणि साखरेच्या वापराशी संबंधित समस्यांबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या साखरेचे सेवन टाळण्याचा सल्ला न देता अतिरिक्त साखरेचे सेवन बंद करण्याचा सल्ला देतात.
 
एखादा पदार्थ तयार करताना, त्यावर प्रक्रिया करताना त्यात साखरेचा वापर करणे म्हणजेच अतिरिक्त साखर होय. यामध्ये मध, मॅपल सिरप आणि फळांचा रस यासारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करणे योग्य राहिल.


मुलांसाठी साखर धोकादायक आहे का? (Is sugar dangerous for children?)


दोन वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा कमी साखरेचे सेवन केले पाहिजे. दररोज सहा टेबलस्पून पेक्षा कमी साखरेचे सेवन करावे. दोन वर्षाखालील मुलांना मात्र अतिरिक्त साखर देऊ नये.


खरंतर, फळे आणि भाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये देखील साखर असते. मात्र तज्ज्ञ आपल्याला 'अ‍ॅडेड शुगर' कमी करण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये कृत्रिम साखरेचा समावेश असतो
 
आहारातील साखरेचे व्यवस्थापन कसे करावे? (How to manage sugar in the diet?)



  • 1. मिठाईशिवाय उत्सव साजरा करा. साखरेस पौष्टिक पर्यायी पदार्थ शोधा. ताज्या फळांचा वापर करा.

  • 2. भरपूर पाणी प्या आणि तुमच्या मुलांनाही तेच करायला सांगा. यामुळे तुमच्या रक्तप्रवाहावर साखरेचा होणारा परिणाम कमी होईल आणि मुलांकडून साखरेचे सेवन देखील कमी होईल.

  • 3. पदार्थांचे सेवन करताना छुप्या साखरेचे प्रमाण शोधा. उदा. डेक्सट्रोज, माल्टोज आणि फ्रक्टोज. लहान मुलांना काहीही देण्यापूर्वी, लेबल वाचणे आणि या लपलेल्या साखरेचा शोध घेणे नेहमीच महत्त्वाचे असते. दही देखील काळजीपूर्वक तपासूनच घ्या. फळांचा रस फक्त जेवणासोबतच प्यावा कारण त्यात नैसर्गिक शर्करा देखील असते.


तुम्ही तुमच्या मुलांना काय खायला देताय याकडे लक्ष द्या. चिंता करु नका किंवा घाबरुन जाऊन साखरचे सेवन पूर्णतः बंद करु नका. खाण्याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मुलाशी कसे वागता यावर या त्याचा परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवा.


-  डॉ सुरेश बिराजदार, नवजात शिशू आणि बालरोगतज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.