Health News : गेल्या काही आठवड्यांपासून बदलेले हवामान, तापमानातील चढ उतार आणि उच्च आर्द्रता यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया (Pneumonia) आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत (Respiratory Problems) वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरत आहेत. फ्लू आणि कोविड 19 (ज्याला 'फ्ल्यूरॉन' असेही म्हणतात) यासोबतच सध्या रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) वाढत आहे.
तज्ञ डॉक्टर सांगतात लहान मुले, वयोवृद्ध आणि ज्यांना मधुमेह आणि दमा यासारख्या समस्या आहेत त्या मुलांची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपचार करणे महत्वाचे आहे. याच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ येणे, कोरडा खोकला, सर्दी, थकवा, उलट्या, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून असतात.
गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुलांवर वेळीच उपचार करा
हिवाळा हा श्वसनाच्या आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांना फुफ्फुसाच्या दीर्घकालीन समस्या जसे की दमा, ब्राँकायटिस, जन्मजात हृदयरोगाचा सामना करावा लागतो. किडनीचे आजार आणि इतर श्वसनाच्या परिस्थितीमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे प्राणघातक ठरत आहे आणि त्यामुळे फुफ्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते. कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुलांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात कारण जेव्हा एखादी आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरड्या हवेत हे थेंब अधिक सहजतेने पसरतात. बदलत्या वातावरणामुळे लहान मुले विषाणूजन्य साथीच्या रोगांचा सामना करत आहेत. गेल्या महिन्यात, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने कोविड महामारीनंतर प्रथमच बालकांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले. लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी आणि बालरोग तज्ज्ञांना माहिती देण्यासाठी, संस्थेने त्यांचे पहिले पुस्तक देखील प्रकाशित केले, ज्यामध्ये 150 आजारांसाठी प्रमाणित उपचार तसेच लहान मुलांमधील सामान्य आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
काय काळजी घ्यावी?
मुलांना जास्त गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे, आजारी लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, खोकताना तोंड व नाक झाकून घ्यावे, हात चांगले धुवावेत, संतुलित आहाराचे सेवन करावे आणि न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत. हिवाळ्यात, मुलांना उबदार कपडे घाला, त्यांना पिण्यासाठी गरम सूप द्या, घरी ह्युमिडिफायर वापरा आणि प्रदूषण टाळा.
- डॉ चेतन जैन, पल्मोनोलॉजिस्ट, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, घाटकोपर
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.