Health News : जंत संसर्गासारखी समस्या ही केवळ मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्येही आढळून येते. जंत एक परजीवी म्हणून ओळखले जातात जे आतड्यांच्या भिंतींना चिकटून राहतात. तुम्हाला माहित आहे का? अनेक प्रकारचे जंत जसे की टेपवर्म्स (tapeworms), राऊंडवर्म्स (Roundworm), पिनवर्म्स (Pinworm) आणि हुकवर्म्स (Hookworms) शरीरात आढळतात. शिवाय जंत संसर्गामुळे इतर अनेक शारीरिक संक्रमणांना बळी पडण्याची शक्यता वाढते. याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. औषधे किंवा सिरप आपल्या मुलाला जंत घालवण्यास मदत करु शकतात. याकरता लवकर निदान करणे आवश्यक आहे.


या संसर्गाचे संभाव्य स्त्रोत म्हणजे दूषित अन्न आणि पाणी तसेस योग्यरित्या न शिजविलेले मांस, अस्वच्छता असे आहेत. जंतांची उपस्थिती दर्शवणारी लक्षणे म्हणजे भूक न लागणे, वजन कमी होणे, पुरळ उठणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, वारंवार लघवी होणे आणि थकवा येणे अशी आहेत.


आपल्या मुलाला कृमीदोष दूर करणे का आवश्यक आहे?


कृमीदोष दूर करण्यासाठी डीवर्मिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आतड्यांमधील जंतांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी औषधाचा वापर केला जातो. वर्म्स दूर करणे आणि रुग्णाला अस्वस्थता आणणारी कोणतीही संसर्ग काढून टाकणे हे या उपचाराचे उद्दिष्ट आहे. जर वर्म्स काढले नाहीत तर ते आतड्यात अंडी घालून गुणाकार करु शकतात आणि मुलाच्या वाढीस आणि विकासावर परिणाम करतात. डीवर्मिंग केल्यामुळे आपल्या मुलास त्याचे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते आणि वर्म्समुळे होणाऱ्या तीव्र आजारांपासून आवश्यक संरक्षण प्रदान करते. मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते कारण त्यांची एकाग्रता वाढू शकते तसेच त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळे निर्माण होत नाहीत. डीवर्मिंग करणे हे आपल्या लहान मुलाचे पौष्टिक आहार वाढवण्यात आणि अशक्तपणा तसेच आंतड्यांसंबंधित संक्रमण व्यवस्थापित करण्यास मदत करते.


काय खबरदारी घ्याल?


- वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुलांमधील कृमीदोष दूर केले पाहिजे. वारंवार येणार्‍या जंताचा प्रादुर्भाव असणा मुलांना वारंवार या जंताचा नाश करावा लागतो.


- आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी डीवर्मिंग प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मुलांना चांगल्या सवयींकरिता पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. असे न केल्यास मुलांमध्ये गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मुलांना बर्‍याचदा असह्य ओटीपोटातील वेदना, उलट्या आणि अतिसारासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो.


- पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यावर किंवा खेळाच्या मैदानावरुन आपल्या मुलांनी हात धुतले की नाही याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे. संसर्ग टाळण्यासाठी दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करू नका. मुलांना फळ आणि भाज्या देण्यापूर्वी ते व्यवस्थित धुवून घ्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा आणि कच्चे मांस खाऊ नका.


- मुले दिवसभर घराबाहेर खेळत असतात.खेळताना मातीमुळे त्यांचे हात खराब होतात.यातून त्यांना जंतूसंपर्क होऊ शकतो.यासाठी खेळल्यानंतर विशेषत: जेवताना मुलांना कटाक्षाने हात धुण्याची सवय लावा.असे केल्याने तुमची मुले सतत आजारी पडणार नाहीत व इतर आरोग्य समस्यांप्रमाणे त्यांना जंताचा त्रास देखील होणार नाही.


- डॉ सुरेश बिराजदार, बालरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.