Health News : योग्य जीवनशैलीचा स्वीकार करणे, धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे, वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करणे आपल्याला दीर्घकालीन किडनी रोगपासून (Chronic Kidney Disease) दूर ठेवण्यास मदत करु शकते. जसे की क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) किंवा क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणजेच किडनीचे कार्य हळूहळू कमी होणे. तुमचे मूत्रपिंड (Kidney) रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करुन ते तुमच्या लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्हाला किडनीच्या आजाराचे (Kidney Disease) निदान झाले असेल तर त्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही तुमची दैनंदिन कामे देखील सहजतेने करु शकणार नाही. प्रगत किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीला डायलिसिस करावे लागते आणि त्याला जगण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची देखील आवश्यकता भासु शकते.
लक्षणे :
मळमळ, उलट्या, भूक मंदावणे, अशक्तपणा, झोप न लागणे, वारंवार किंवा कमी लघवीचे प्रमाण, स्नायूंमधील वेदना, पाय आणि घोट्याला सूज येणे, त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात द्रव जमा झाल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, छाती दुखणे ही लक्षणे दिसून येतात.
कारणे :
मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, वय, पॉलीसिस्टिक किडनी विकार किंवा इतर अनुवांशिक किडनी विकार, हृदयविकार, मूत्रपिंडाचा संसर्ग जो पायलोनेफ्रायटिस म्हणून ओळखला जातो आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम करणारी औषधे घेणे हे मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत ठरणारे काही घटक आहेत.
काय गुंतागुंत निर्माण होऊ शकतात?
तुमचे हात आणि पाय सूजतात, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, हृदयविकार, हाडे कमकुवत होणे आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका, प्रतिकारशक्ती कमी होणे, संक्रमण आणि गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होते.
क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) टाळण्यासाठी उपाय कोणते?
1. नियमित तपासणी करा : जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर तुम्हाला नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
2. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी तुमचा रक्तदाब तपासा : उच्च रक्तदाब तुमच्या मूत्रपिंडावर परिणाम करु शकतो आणि तुम्हाला किडनीच्या आजाराला बळी पडू शकतो. तुमचा रक्तदाब उच्च राहिल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला औषध लिहून देतील. जीवनशैलीत साधे बदल करणे, जसे की मीठाचे सेवन आणि अल्कोहोल कमी करणे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक राहिल.
3. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे : तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमच्या मूत्रपिंडाचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करा आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा.
4. व्यायाम : निरोगी वजन राखण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. हे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास आणि किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करेल.
5. धूम्रपान टाळा : धूम्रपान हे फुफ्फुसावरच नाही तर किडनीवरही दुष्परिणाम करते. धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते.
- डॉ भावीन पटेल, सल्लागार युरोलॉजिस्ट, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.