Health News : तुम्हाला कावीळ (Jaundice) झाली असेल आणि त्यावर योग्य उपचार घेतले नाहीत दुसराच त्रास उद्भवू शकतो. असाचा काहीसा प्रकार मुंबईतील (Mumbai) एका 30 वर्षीय महिलेच्या बाबतीत घडलं. पोटदुखीला सुरुवात झाली असता भाविका पारेख (नाव बदलेले आहे) यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले होते. त्यावेळी तपासणीमध्ये त्यांना कावीळ असल्याचे निदान झाले होते. मात्र त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नव्हते ज्यामुळे त्यांच्या पोटदुखीचा त्रास वाढतच गेला. पोटदुखीमुळे बेजार झालेल्या भाविका यांना मुंबई सेंट्रल इथल्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे त्यांची तपासणी केली असता समजलं की त्यांच्या पित्ताशयात (Gall Bladder) आणि पित्त वाहिकेमध्ये खडे झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या पित्ताशयातून तब्बल 30 खडे (Gallstones) काढले.


वोक्हार्ट रुग्णालयाचे सल्लागार पोटविकार तज्ज्ञ डॉ. शंकर झंवर यांनी भाविका पारेख यांच्याबाबत बोलताना म्हटलं की, "जर त्यांची नीट तपासणी होऊन अचूक निदान झाले असते तर त्यांच्यावर इथे येण्याची गरज भासली नसती. कावीळ झालेल्या व्यक्तीचे यकृत नीट काम करत आहे अथवा नाही हे तपासण्यासाठीची चाचणी आणि अल्ट्रासाऊंड चाचणी करणं गरजेचं असतं." रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा भाविका यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. इथे त्यांच्यावर एंडोस्कोपी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांना त्यांच्या पित्तवाहिनी खड्यांनी भरली असल्याचे दिसून आले. हे खडे बऱ्यापैकी म्हणजे 8 ते 9 मिलीमीटर आकाराचे होते. असे जवळपास 30 खडे भाविका यांच्या पित्ताशयातून आणि पित्तवाहिनीतून काढण्यात आले. एंडोस्कोपीच्या मदतीने पित्ताशय किंवा पित्तवाहिनीतून खडे काढण्याच्या या प्रक्रियेला इआरसीपी (ERCP) म्हणतात. डॉक्टरांनी सांगितले की इआरसीपीच्या सहाय्याने पित्ताशय किंवा पित्तवाहिनीतून खडे काढण्याबाबतच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने पित्तवाहिनीतून आजवर इतके खडे कधीही काढण्यात आले नव्हते.  


...तर संसर्ग होण्याची भीती होती : डॉक्टर


भाविका पारेख यांना रुग्णालयात आणण्यात आणखी उशीर झाला असता तर संसर्ग होण्याची भीती होती आणि हा संसर्ग नंतर रक्ताद्वारे अधिक पसरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे स्वादुपिंडाची समस्या उद्भवली असती किंवा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले असते. पित्तवाहिनीतून एंडोस्कोपीच्या मदतीने खडे काढण्याची ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. याशिवाय शस्त्रक्रियेनंतर काय होऊ शकतं याबाबतची रुग्णाला कल्पना देणेही गरजेचे असते. 


पित्ताशयातील खड्यांचं निदान लवकर झाल्याने पुढील वाईट गोष्टी टळल्या : डॉ. मेहदी काझेरोनी


मुंबई सेंट्रलस्थित वोक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार लेप्रोस्कोपी शल्यचिकित्सक मेहदी काझेरोनी यांनी सांगितले की, "पित्तवाहिनीत खडे असल्याचे निदान लवकर झाले आणि ते काढण्यासाठी लवकर हालचाल केल्यामुळे पुढील वाईट गोष्टी टाळता आल्या. यामुळे पित्ताशय काढण्यासाठीची लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी केली आणि पुढच्या 48 तासात रुग्णाची प्रकृती सुधारली. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्याने कोलोनजायटीस (पित्ताशयाचा दाह), स्वादुपिंडाचा दाह (Pancreatitis), गंभीर स्वरुपाची कावीळ (Obstructive Jaundice) या बाबी टाळता आल्या. पोटदुखी होत असेल तर कावीळ असो अथवा नसो त्याचे निदान वेळेत होणे गरजेचे असते. तसे झाले तर पुढील त्रास टाळता येतात." 


डॉक्टरांनी नवे जीवन दिलं : भाविका पारेख


भाविका पारेख यांनी बोलताना म्हटले की, "नेहमीच्या डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर मला आठवडाभर पोटदुखी होत होती. मला कावीळ झाल्याचे निदान करण्यात आले होते. सुरुवातीला काविळीचे औषध घेत असल्याने पोटदुखी कमी होती, मात्र नंतर पोटदुखी वाढायला लागली. मी 30 डिसेंबर 2022 रोजी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल झाले. मला उलट्या होत होत्या, थंडी वाजून ताप येत होता, अशक्तपणा आला होता आणि चक्कर आल्यासारखी वाटत होती. पोटदुखी तर वाढतच चालली होती. यामुळे माझी तपासणी करण्यात आली ज्यात माझ्या पित्ताशयात आणि पित्तवाहिनीत खडे झाल्याचे दिसून आले होते. यामुळे माझ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मी माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि खासकरुन डॉ.शंकर आणि डॉ. मेहदी यांची आभारी आहे, कारण त्यांनी मला नव्या वर्षात नवे जीवन दिले आहे."