Health News : चिपळूणमध्ये (Chiplun) राहणाऱ्या एका 90 वर्षीय आजीच्या डोळ्यातून 15 सेंटीमीटरचा जिवंत जंत (Worm) काढण्यात लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ नदीम खतीब यांना यश आले आहे. डॉ नदीम खतीब यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे आणि उपचारांमुळे वृद्ध महिलेची दृष्टी वाचली आहे. आतापर्यंत विविध आजारांसंबंधित अनेक रुग्ण पाहिले आहेत. परंतु, एक विचित्र प्रकार नुकताच समोर आला आहे. चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ. नदीम खतीब यांनी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क 15 सेंटिमीटरचा जिवंत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स Ascaris Worms) शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला आहे.
महिलेच्या डोळ्यातून जिवंत जंत बाहेर काढला
शैला शिंदे (नाव बदललेलं) असे या वृद्ध महिलेचं नाव तपासणीला येण्यापूर्वी मागील तीन-चार दिवसांपासून त्यांच्या डोळ्याला सूज आणि तीव्र वेदना जाणवत होती. दुखणं वाढल्याने कुटुंबियांनी या महिलेला चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नेत्रतज्ज्ञ डॉ. नदीम खतीब यांनी दुर्बिणीतून तपासणी केली असता या महिलेच्या उजव्या डोळ्यात मोठा जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) असल्याचं निदान झालं. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार डॉ नदीम खतीब यांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन महिलेच्या डोळ्यातून जिंवत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) बाहेर काढला. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचं दुखणं कायमस्वरुपी दूर झालं आहे.
शस्त्रक्रियेनंतर महिलेची डोळ्याच्या दुखण्यातून सुटका
चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ. नदीम खतीब म्हणाले की, "या महिलेला उपचारासाठी आणले तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेदना होत होत्या, डोळा लाल दिसत होता. अशा स्थितीत महिलेच्या डोळ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत महिलेच्या डोळ्यात जंत असल्याचं समोर आले. याला वैद्यकीय भाषेत अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स असे म्हणतात. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करुन हा जंत काढणं गरजेचं होतं. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत डोळ्यातील आतील खालच्या बाजूला लहानशी चीर देऊन हा जंत काढण्यात आला. साधारणतः 15 सेंटीमीटरचा हा जंत होता. या शस्त्रक्रियेनंतर महिलेची डोळ्याच्या दुखण्यातून सुटका झाली आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा पाहून त्याच दिवशी त्यांना डिस्जार्च देण्यात आले." तसेच पुढील दोन दिवसांनी त्या जेव्हा फॉलोअपसाठी आल्या तेव्हा त्या खूप आनंदी होत्या.
वेळीच उपचार न झाल्यास दृष्टी जाण्याचीही शक्यता
डॉ. नदीम खतीब पुढे म्हणाले की, "अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स हा जंत साधारणपणे खाण्यातून पोटात जाऊन आणि तिथे तो अंडी घालतो. रक्तवाहिन्यावाटे तो शरीराच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतात आणि तिथेच त्यांची वाढही होते. मेंदू, डोळा अशा ठिकाणी अशा प्रकारे जंत आढळणे क्वचितच घडते. परंतु असे झाल्यास हा वर्म डोळयांना इजा पोहोचवतो. वेळीच उपचार न झाल्यास दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा स्थितीत तातडीने उपचार करणं खूप गरजेच असते. त्यानुसार या महिलेवर तातडीने उपचार करुन हा जंत डोळ्यातून काढण्यात आला आणि पुढील वाढीव त्रास टाळण्यासाठी जंतांवरील उपचार सुरु करण्यात आले आहेत."