Health : आपण अनेकदा पाहतो, काही जण सकाळी सकाळी गवतावर अनवाणी चालतात, तसेच आपण थोरा-मोठ्यांच्या तोंडी सुद्धा हेच ऐकतो, की गवतावर अनवाणी चाललं की दृष्टी सुधारते. पण त्यामागील नेमकं तथ्य काय आहे? आज आम्ही तुम्हाला तज्ज्ञांच्या माध्यमातून याबद्दल माहिती देणार आहोत, जाणून घ्या
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे दृष्टी कमी होतेय?
डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, त्यात थोडासाही दोष असेल तर आपले जग अंधकारमय होऊ शकते. त्यामुळे त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डोळ्यांचे आरोग्य खालावत आहेत. काहींना लहान वयातच डोळ्यांना चष्मा लागतोय. डोळे निरोगी ठेवण्यासाठी, डॉक्टर औषधे आणि व्हिटॅमिन ए असलेल्या आहाराचा समावेश करण्याची शिफारस करतात. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की, सकाळी लवकर गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी सुधारते. काही लोक त्याचे पालनही करतात. पण असे केल्याने खरोखरच दृष्टी वाढते का? ही एक मिथ्य आहे की सत्य आहे? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सीमा राज यांना याबद्दल माहिती दिलीय.
गवतावर अनवाणी चालल्याने खरोखरच दृष्टी सुधारते का?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही किंवा डॉक्टरही ते योग्य मानत नाहीत, परंतु ज्यांना याचा अनुभव आला आहे अशी काही लोक यावर विश्वास ठेवतात. निसर्गोपचारात हे फायदेशीरही मानले जाते. निसर्गोपचारानुसार, गवतावर अनवाणी चालल्याने काही प्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते. डोळ्यांच्या नसांचे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि दृष्टी सुधारते. ॲलोपॅथी यावर विश्वास ठेवत नाही, असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय
डोळ्यांना निरोगी बनवण्याचा उत्तम उपाय काय?
तज्ज्ञांच्या मते, एकदा का तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला की तुम्ही तो कमी करू शकत नाही, पण तो फक्त नियंत्रणात ठेवू शकता. डोळ्यांना निरोगी बनवण्याचा उत्तम उपाय म्हणजे डोळ्यांचा व्यायाम करणे, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा, त्यात व्हिटॅमिन ए असते, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात.
डॉक्टरांच्या मते, गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी सुधारते ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. मात्र हे फायदे मिळू शकतात-
स्थिरता वाढते
तणाव कमी होतो
मानसिक स्थिती सुधारते
झोप सुधारते
शारीरिक वेदना कमी होतात
शारीरिक तसेच मानसिक संतुलन राखले जाते
हेही वाचा>>>
Monsoon Care : आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आल्हाददायक हवामानासोबत आरोग्याची आव्हानंही, आजारपणा नको तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )