Health: अवघ्या देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता दिवाळी संपून काही दिवसच झालेत. ज्यानंतर आता देशातील विविध शहरात वायू प्रदूषणाची पातळी वाढताना दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, खराब हवेच्या संपर्कात आल्याने गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेची ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते. जेव्हा जेव्हा बाहेर प्रदूषणाची पातळी वाढते, तेव्हा लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रदूषणामुळे आपण घरात सुरक्षित आहोत का? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घ्या..


घरातील वायू प्रदूषण कसे वाढते?


हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ. संगीता चेकर म्हणतात की, घरातील प्रदूषित हवेचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे, कारण अनेकदा बाहेरचे प्रदूषण पाहून लोक घरातच राहणं पसंत करतात, आणि घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. इतकंच नाही तर काही वेळा घरातील हवा आपल्यासाठी जास्त घातक ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. कधीकधी घरातील वातावरणही शुद्ध नसते. ज्यामुळे घरातील हवेत हानिकारक गुणधर्म वाढू शकतात. 


घरातील हवा कोणत्या गोष्टी प्रदूषित करत आहेत?


साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू


घरातील काही सामान्य घरगुती वस्तू खराब AQI ची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. फ्लोअर क्लिनिंग लिक्विड्स जे सुगंधित असतात त्यात अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs) असतात ज्यामुळे हवेला सुरवातीला चांगला वास येतो परंतु दीर्घ कालावधीत श्वास घेतल्यास ते हानिकारक असू शकतात. हा सुगंधी घटक आपल्या श्वसनाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आणि संसर्ग होऊ शकतो.


कार्पेट आणि फर्निचर


घरातील कार्पेट आणि फर्निचरमध्येही विषारी पदार्थ असू शकतात. खरं तर, लोक या गोष्टी जास्त स्वच्छ करत नाहीत आणि नियमितपणे फर्निचरची धूळ न केल्यामुळे, त्यावर हानिकारक धूळ आणि कण जमा होतात, जे श्वास घेताना आपल्या नाकातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.


वेंटिलेशन नसणे


तुमच्या घरात वेंटिलेशनची योग्य व्यवस्था नसली तरीही, AQI पातळी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते, कारण वेंटिलेशन नसल्यामुळे, स्वयंपाक करताना निघणारा धूर घरातच राहतो आणि संपूर्ण वातावरणात पसरतो. ही प्रदूषित हवा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे दम्याचा धोका दुपटीने वाढतो.


अगरबत्ती


पूजेमध्ये वापरण्यात येणारी ही वस्तू जवळपास प्रत्येकाच्या घरात जाळली जाते. जरी लोक याला धार्मिकतेशी जोडत असले तरी, तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, घरातील हवेतील प्रदूषण सर्वात जास्त वाढवत असेल तर ते अगरबत्ती आहे.


रूम फ्रेशनर


घरातील प्रदूषित हवेपासून बचाव करण्यासाठी लोक रूम फ्रेशनरचा वापर करतात. जाहिरातींमध्ये, या सुगंधित फवारण्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याचे सांगितले जाते परंतु ते त्याच्या उलट कार्य करते. रूम फ्रेशनरचा वास जास्त वेळ वास घेतल्यानेही नाक आणि घशात संसर्ग वाढतो.


हेही वाचा>>>


Women Health: काय सांगता! नियमित मासिक पाळीसोबत अनेक महिला PCOS मुळे त्रस्त? WHO काय म्हणते? महिलांनो लक्ष द्या...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )