Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. उच्च रक्तदाब...मधुमेह..लठ्ठपणा...आणि यापैकी एक हृदयविकार.. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे हे हृदयविकाचे प्रमुख कारण आहे. ते वेळेवर ओळखले गेले नाहीत, तसेच त्यावर उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयातील रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांची सुरुवातीची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेळीच उपचार करून हृदयविकाराच्या गंभीर परिणामांना प्रतिबंध करता येऊ शकतो. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावी? याबाबत मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत बोरसे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या.
हृदयातील रक्तवाहिन्यांना अडथळे कसे ओळखाल? हृदयविकाराचा झटका कसा येतो?
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या धमन्या फॅटी एथेरोस्क्लेरोसिसमुळे अरुंद किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. किंवा त्यांच्यात अडथळा निर्माण होतो, तेव्हा कोरोनरी आर्टरी डिसीझ (CAD) हा आजार उद्भवतो. या आजारात या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅटी डिपॉझिट्स आणि इतर पदार्थांचा साठा होतो. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह कमी होतो. परिणामी, छातीत वेदना किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृदयातील रक्तवाहिन्यामधील अडथळ्यांची प्राथमिक लक्षणं
हृदयातील रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांची प्राथमिक लक्षणे ओळखणे कठीण असू शकते. कारण ही लक्षणे व्यक्तीनुसार बदलतात. काही लक्षणे सर्वसामान्यपणे आढळतात.
छातीत वेदना होणे किंवा अस्वस्थता : हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये सर्वसमान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे छातीत वेदना होणे किंवा अस्वस्थ वाटणे. यात छातीवर दाब आल्यासारखा वाटतो, दाबल्यासारखे वाटते किंवा छातीच्या मध्यभागी किंवा डावी बाजू भरगच्च झाल्यासारखे वाटू शकते. ही वेदना खांदे, मान किंवा जबड्यात देखील पसरू शकते.
श्वास घेण्यास त्रास : दैनंदिन शारीरिक कामे करताना किंवा विश्रांतीच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होणे, हे हृदयाकडे कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्याचे लक्षण असू शकते. छातीत वेदना होण्यासोबत हा त्रास होऊ शकतो किंवा तसे न होतादेखील श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
थकवा : अनपेक्षित थकवा येणे किंवा खूप थकवा वाटणे. विशेषत: जर हा थकवा अचानकपणे येत असेल किंवा दैनंदिन कामांमध्ये अडथळा आणत असेल तर हे हृदयाशी संबंधित समस्येचे प्राथमिक लक्षण असू शकते. शारीरिक क्षमतेत घट होणे आणि शारीरिक कमकुवतपणा यांच्याशीही याचा संबंध असू शकतो.
चक्कर येणे किंवा भोवळ येणे : कमी रक्तपुरवठ्यामुळे भोवळ येणे, चक्कर येणे किंवा गरगरणे हे हृदयाशी संबंधित असू शकते. हे अचानक घडू शकते आणि त्यासोबत छातीत वेदना होणे किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी इतर लक्षणे जाणवू शकतात.
मळमळ किंवा अपचन : काही व्यक्तींना मळमळ, अपचन किंवा पोटात वरच्या भागात अस्वस्थता जाणवते. काही वेळा ही लक्षणे हृदयाशी संबंधित नसून पचनाक्रियेशी संबंधित असल्याचे वाटू शकते.
थंडगार घाम : विनाकारण थंड घाम येणे हे हृदयातील समस्येचे लक्षण असू शकते. छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, यासोबत हे लक्षण दिसू शकते.
हेही वाचा>>>
काय सांगता..! आता धूम्रपान न करणाऱ्यांनाही Lung Cancer चा धोका? कसा होतो हा कर्करोग? एका अभ्यासातून खुलासा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )