Health: अवघ्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स (Mpox) बाबत आणखी एक चिंताजनक बाब समोर आलीय. ती म्हणजे अमेरिकेत Mpox चा एक नवीन स्ट्रेन म्हणजेच याचा नवीन प्रकार सापडला आहे, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने याची पुष्टी केली आहे. एमपॉक्सचा हा नवीन स्ट्रेन जुन्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैज्ञानिकांनी या नवीन विषाणूला 'क्लेड 1' असे नाव दिले आहे.
अमेरिकेत अलर्ट जारी, भारतासाठीही चिंता?
मंकीपॉक्सच्या या नवीन स्ट्रेनची लक्षणे तापासारखी आहेत, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने याबाबत अलर्ट जारी केला आहे. लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीडीसीच्या मते, ताप बराच काळ राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा तसेच रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कॅलिफोर्नियामध्ये सापडला पहिला रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत Mpox Clade 1 स्ट्रेनचे पहिले प्रकरण समोर आले आहे, त्यानंतर आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॅलिफोर्नियाची रहिवासी आहे. सध्या तिला घरीच आयसोलेशन करण्यात आले आहे. तिचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिच्या दिनचर्येची नोंद करण्यात आली आहे, जेणेकरून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चौकशी करता येईल.
लोकांनी घाबरू नये, उपचार शक्य आहेत
अमेरिकेत अलर्ट जारी करण्यात आला आहे की, क्लेड 1 स्ट्रेन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अधिक सहजपणे पसरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास पीडितेची प्रकृती गंभीर होऊ शकते. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, Mpox वर उपचार केले जाऊ शकतात आणि लोक त्यातून बरे होतात, घाबरण्याची गरज नाही.
MPOX च्या नवीन विषाणूची लक्षणे आणि उपाय?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या नवीन विषाणूमध्ये ताप, डोके आणि शरीरात दुखणे, थंडी वाजून येणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसत आहेत. संक्रमित व्यक्ती, संक्रमित बेडशीट किंवा सुईला स्पर्श केल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो. 2022 मध्ये पहिल्यांदाच अमेरिकेत एमपीओएक्सचा रुग्ण आढळला होता. अलीकडेच, आफ्रिकेत एमपॉक्सचे क्लेड I रुग्ण आढळले. यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, मास्क घाला आणि संक्रमित व्यक्तीपासून पुरेसे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा>>>
Health: सावधान! भारतावर आणखी एका संसर्गाची टांगती तलवार? WHO चा इशारा, लहान मुलांना सर्वाधिक धोका?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )