Health: सध्या भारतावर आणखी एका संसर्गाची टांगती तलवार दिसत आहे. असं आम्ही नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हा आजार जगात पसरणारा एक नवीन उद्रेक मानला गेलाय. ज्यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरात या संसर्गामुळे जवळपास 1,07,500 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या आजाराबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.
भारतासाठी घातक 'हा' संसर्ग - WHO
आम्ही ज्या संसर्गाबद्दल सांगत आहोत, तो संसर्गा म्हणजे गोवर आहे, ज्याला इंग्रजीत मिसल्स असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा सहसा मुलांवर परिणाम करतो, असे असले तरी हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. गोवर हा एका विशिष्ट विषाणूमुळे होतो आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. अलीकडील WHO च्या रिपोर्टनुसार, गोवर संसर्ग भारतासाठी घातक असल्याचे वर्णन केले आहे.
भारताला दुसरे स्थान
या अहवालात 57 देशांमध्ये गोवरच्या प्रादुर्भावाबद्दल बोलले गेले आहे, ज्यामध्ये भारताला दुसरे स्थान मिळाले आहे. याशिवाय, अहवालात असे म्हटले आहे की, गोवर संसर्गाविरूद्ध लसीकरणामध्ये सातत्याने घट होत आहे, ज्यामुळे संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. अहवालानुसार, 2023 मध्ये गोवरची 10.3 दशलक्ष प्रकरणे नोंदवून, संसर्गाच्या घटनांमध्ये जागतिक स्तरावर 20% वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, अंदाजे मृत्यूच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 8% वाढ झाली आहे, रिपोर्टनुसार, जगभरात गोवरमुळे 107,500 मृत्यू झाले आहेत.
गोवर म्हणजे काय?
गोवर हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, जो मॉर्बिलीव्हायरस नावाच्या विषाणूद्वारे पसरतो. हा संसर्ग मुख्यतः मुलं आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. हा विषाणू हवेतून पसरतो आणि शिंकणे तसेच खोकल्यामुळे हवेतील कणांमध्ये मिसळून शरीरात प्रवेश करतो.
गोवरची प्रारंभिक लक्षणं
या विषाणूजन्य संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- ताप येणे.
- खोकला, सहसा कोरडा.
- वाहणारे नाक.
- डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा.
- शरीरावर लाल पुरळ किंवा चट्टे
- तोंडाच्या आत पांढरे डाग.
गोवरवरील उपचार
गोवर हा विषाणूजन्य संसर्ग असल्याने त्यावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु त्याची लक्षणे कमी करता येतात.
- ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलसारखी औषधे घेतली जाऊ शकतात.
- शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पुरेसे पाणी प्या.
- पौष्टिक अन्नाचे सेवन करा.
- गंभीर प्रकरणांमध्ये त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण
WHO च्या अहवालानुसार गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरणाचा अभाव. अहवालात असे म्हटले आहे की, गोवर लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू करण्यात आला होता, परंतु असे असूनही लसीकरणाच्या अभावामुळे गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे.
हेही वाचा>>>
Health: अजबच.. Red Wine प्यायल्याने कर्करोगाचा धोका होतो कमी? काय आहे सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )