Microplastics Side Effects: अवघ्या जगभरात प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. हे वाढण्यामागे प्लास्टिक हे एक सामान्य कारण समजले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, त्याचा आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणामही होतो. मायक्रोप्लास्टिक म्हणजे डोळ्यांना न दिसणारे प्लास्टिकचे छोटे कण. मायक्रोप्लास्टिक्सचा यकृत, रक्त, मूत्रपिंड आणि पोट यासह शरीराच्या अवयवांवर हानिकारक प्रभाव पडतो. हे कण श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात. हे कण अन्नातूनही शरीरात प्रवेश करतात. त्वचेवर मायक्रोप्लास्टिक्स देखील जमा होतात, ज्यामुळे त्वचेला संसर्ग होतो. मायक्रोप्लास्टिक्सचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो, असे यावरील नवीन संशोधनात म्हटले आहे. या अभ्यासाविषयी जाणून घेऊया.
संशोधनात काय म्हटलंय?
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, एका अहवालात असे दिसून आले आहे की, पॉलीप्रॉपिलीन आणि नायलॉनसारखे मायक्रोप्लास्टिक्स श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्याचा मेंदूवर परिणाम होतो. या संशोधनात हे मायक्रोप्लास्टिक्स मानवी मेंदूमध्ये आढळून आले, ज्यानंतर मेंदूचा इतर अवयवांवरही परिणाम होताना दिसला. जर्नल ऑफ सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, मायक्रोप्लास्टिक्स मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. हे संशोधन चीनमध्ये करण्यात आले आहे, जिथे हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला आहे. उंदरांच्या मेंदूमध्ये असलेल्या प्लास्टिकचा मागोवा घेण्यात आला आहे.
उंदरांच्या मेंदूमध्ये आढळले हे प्लास्टिक?
चीनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, उंदरांच्या मेंदूमध्ये फ्लोरोसेंट पॉलिस्टीरिन नावाचे प्लास्टिकचे कण आढळले आहेत. या प्लास्टिकच्या कणांचा वापर खेळणी आणि प्लॅस्टिकची पाकिटे बनवण्यासाठी केला जातो. या प्लास्टिक कणांमुळे उंदरांच्या डोक्यातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त, ते मज्जासंस्थेला देखील नुकसान करते. यामुळे उंदरांच्या रक्तातही काही असामान्य कण दिसले. ज्यामुळे उंदरांची स्मरणशक्ती कमी असल्याची पुष्टी देखील झाली आणि त्यांना स्ट्रोकचा धोका वाढल्याचे आढळले.
मायक्रोप्लास्टिकचे तोटे
- स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष न लागणे.
- न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका वाढतो.
- मुलांच्या मानसिक आरोग्याच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.
हेही वाचा>>>
Weight Loss: ना कोणता व्यायाम..ना कोणतं डाएट..3 आठवड्यांत वजन केलं कमी? आर. माधवनने सांगितलं 'वेट लॉस सीक्रेट! एकदा जाणून घ्याच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )