Health : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं, सतत बसून काम, आहाराबाबत शिस्तप्रिय नसणे, या आणि अशा विविध गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यापैकी बहुतांश लोक हे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. या गंभीर आरोग्य समस्यांची वाढती संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना गंभीर इशारा दिलाय. मधुमेह आणि हृदयविकार लवकरच महामारीचे रूप धारण करणार असल्याचं WHO चं म्हणणं आहे. आकडेवारीनुसार, जगभरातील दोन तृतीयांश मृत्यू या आजारांमुळे होत आहेत. ज्यामुळे WHO ने जवळपास सर्वच देशांना संतुलित आहार आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरात लवकर धोरणं तयार करण्यास सांगितले आहे.


 


जगभरात दोन तृतीयांश मृत्यू


दक्षिण-पूर्व आशियासाठी डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद म्हणाल्या, "अधिक वजन, लठ्ठपणा आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिजम विकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही समस्या मुलं आणि प्रौढ दोघांनाही प्रभावित करते. तर हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा इशारा वाजेद यांनी दिला. या आजारांमुळे आता दोन तृतीयांश मृत्यू होत आहेत. आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील सुमारे 50 लाख मुलं लठ्ठपणाने त्रस्त आहेत, तर 5 ते 19 वर्षे वयोगटातील 3 लाख 73 हजार मुलं याच समस्येचा सामना करत आहेत.


 


जीवनशैलीत बदल करण्याची गरज



दक्षिण-पूर्व आशिया सध्या जलद लोकसंख्याशास्त्रीय बदल, शहरीकरण, आर्थिक वाढ आणि असंतुलित आहार यांच्याशी झुंजत आहे. याचा लोकांच्या जीवनशैलीवरही विपरीत परिणाम झाला आहे. सुमारे 74% किशोरवयीन आणि 50% तरुण शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, ही वाढ अशीच राहिली तर 2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणे कठीण होईल.


 


जंकफूडवर बंदी


वाजेद म्हणाल्या की, अनेक देशांनी आधीच फूड लेबलिंग नियम लागू केले आहेत, ट्रान्स फॅट्सवर बंदी घातली आहे आणि गोड पेयांवर कर वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. पण काही देशांमध्ये निरोगी समाजासाठी अजूनही अनेक पावले उचलण्याची गरज आहे. आता वेळ आली आहे की, आपण आपला आहार आणि शारीरिक क्रियाकलाप पुन्हा परिभाषित करू शकू, जेणेकरून आपण केवळ आपल्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील निरोगी भविष्य सुनिश्चित करू शकू.


 


हेही वाचा>>>


Women Safety : महिलांनो..सोशल मीडियावर होतेय छेडछाड, घाबरू नका, बिनधास्त उत्तर द्या, 'या' 5 मार्गांनी स्वतःचे संरक्षण करा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )