Health : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यामुळे सध्या विविध आजारांनी लोकांना ग्रासलय. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञही सांगतात की, आरोग्य निरोगी हवं असेल तर जीवनशैली आणि आहार सुधारणे सर्वात महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही आजारांचा धोका आनुवंशिक असतो, त्यासाठी तुम्हाला विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. यापैकी काही 'सायलेंट किलर' आजार मानले जातात, जे शरीराला आतून पोकळ बनवतात. या आजारांमुळे मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येत आहे.आज आपण जाणून घेऊया काय आहेत हे सायलेंट किलर? तुम्हाला तर या संबंधित काही लक्षणं नाही ना? जाणून घ्या..


 


सायलेंट किलर रोगांचे धोके, उद्भवणाऱ्या समस्या काय?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सायलेंट किलर आजार कधीही गंभीर स्वरूप घेऊ शकतो. यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. दुर्दैवाने, केवळ भारतातच नाही तर अनेक देशांतील मोठी लोकसंख्या या आजारांच्या विळख्यात आहे. तुम्हीही याला बळी पडत आहात का?


 


उच्च रक्तदाब आणि त्याचे धोके


हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही सर्वात गंभीर आरोग्य समस्या म्हणून आरोग्य तज्ज्ञ मानतात. हृदयरोग हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब हा हृदय तसेच रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी सर्वात मोठा धोका घटक म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाब केवळ हृदयविकारावरच नाही तर शरीराच्या इतर अनेक भागांवर गंभीरपणे परिणाम करू शकतो. त्यामुळे हा सर्वात धोकादायक 'सायलेंट किलर डिसीज' म्हणून ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगभरात 30-79 वयोगटातील 1.28 अब्ज (128 कोटींहून अधिक) लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे.



उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना या आजाराची माहिती नसते


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या बहुतेकांना हा आजार आहे हे माहीत नसते, कारण सहसा त्याची लक्षणे स्पष्ट नसतात. पण हळूहळू उच्च रक्तदाबामुळे अनेक गंभीर आणि जुनाट आजारांचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या जीवघेण्या समस्यांचे हे मुख्य कारण आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराव्यतिरिक्त अनेक गंभीर आजार होऊ शकतात, जसे की स्ट्रोक, किडनीचे आजार-मूत्रपिंड निकामी होणे, धमनी रोग आणि दृष्टी कमी होणे.



लठ्ठपणा हा देखील मोठा धोका


उच्च रक्तदाब प्रमाणेच, लठ्ठपणा देखील आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर आणि जीवघेणा आजार म्हणून ओळखला आहे. जास्त वजनामुळे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या लोकांना चयापचय, हृदयविकार, मधुमेह, पुनरुत्पादक आणि फुफ्फुसीय रोगांचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांमध्ये जुनाट आजार आणि मृत्यूचा धोका वाढवते.



मधुमेह आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या


मधुमेह ही जगभरात झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. हा एक सायलेंट किलर रोग मानला जातो, ज्याची वेळीच काळजी न घेतल्यास मज्जातंतूंपासून ते डोळे आणि हृदयापर्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मधुमेहाच्या स्थितीमुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीला गंभीर नुकसान होते, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. अशा लोकांमध्ये दृष्टी गमावण्याचा धोकाही जास्त असतो.


 


हेही वाचा>>>


Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )