Health: चॉकलेट केक... पाईनअॅप्पल केक...ब्लू बेरी... रेड वेल्वेट केक.. ब्लॅक फॉरेस्ट केक..असे विविध केकचे नाव ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. अनेकांना केक खायला प्रचंड आवडतो. कोणाचा वाढदिवस असू द्या, किंवा एखादं चांगलं काम झालं तर आजकाल केक कापून साजरा करण्याचा ट्रेंड आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केक खाल्ल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अलीकडेच बेंगळुरूमध्ये 12 प्रकारच्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळले आहेत. जेव्हापासून याबाबत माहिती समोर आली आहे, तेव्हापासून लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.
सरकारने जारी केली ॲडव्हायझरी
कर्नाटक फूड सेफ्टी अँड क्वालिटी डिपार्टमेंटने लोकांना यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने केकच्या संभाव्य धोक्यांविषयी लोकांना माहिती देणारा सल्लागार जारी केला आहे. या ॲडव्हायझरीमध्ये सांगण्यात आले आहे की, अनेक बेकरींमधून केकचे नमुने गोळा करण्यात आले होते, ज्यामध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यात रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकचा समावेश आहे.
केकमध्ये आढळले कर्करोग निर्माण करणारे घटक?
कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की, एकूण 235 केक नमुन्यांपैकी 223 सुरक्षित आढळले आहेत, परंतु 12 केकमध्ये धोकादायक पातळीवर कृत्रिम रंग असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार, रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केक, जे लोक मोठ्या उत्साहाने खातात, ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
'हे' नुकसान होऊ शकते
बेंगळुरूमध्ये 12 प्रकारच्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळले आहेत. यानंतर कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने लोकांना यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.माहितीनुसार, चाचणी केलेल्या 12 केकमध्ये अल्लुरा रेड, सनसेट यलो एफसीएफ, पॉन्सो 4आर, टारट्राझिन, कार्मोइसिन सारखे पदार्थ आढळून आले. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. सरकारने आदेश दिले आहेत की, सर्व बेकरींना सुरक्षा मानकांचे पालन करावे लागेल. तसेच बेकरी दुकानदारांना केकमध्ये कृत्रिम रंग न वापरण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाचे म्हणणे आहे की कृत्रिम रंग असलेल्या खाद्यपदार्थांचा वापर केल्याने कर्करोगासारख्या आजारांचा धोका तर आहेच पण त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा>>>
Health: भारतात 50 वर्षांखालील पुरुषांना धोका, प्रायव्हेट पार्ट्सला होणाऱ्या 'या' कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, 'ही' लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )