Health Care Tips : उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताची (Heatstroke) सर्वाधिक जोखीम अधिक असते. अतिसार (Diarrhea), लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. लहान मुलं शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. मुलांची त्वचा नाजूक असते. तेव्हा त्यावर प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम होऊन त्वचा पोळली जाते व काळी पडण्याची शक्यता असते.
उघड्या अन्नावरील विषाणू व विषाणूयुक्त पाणी यातून आजार जडतो. तसेच दूषित बर्फामधून याचा फैलाव होत असतो. मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उलट्या किंवा तापाची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. मदरहूड हॉस्पिटल येथील सल्लागार बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत मोरलवार यांनी वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे करायचे याबद्दल माहिती दिली आहे.
वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल?
- मुलांना दिवसभर पाणी पिण्यास प्रोत्साहन द्या जेणेकरुन ते हायड्रेटेड राहतील विशेषतः मैदानी खेळादरम्यान त्यांना पुरेसे पाणी द्या. दररोज किमान 10-12 ग्लास पाणी प्या.
- घराबाहेर पडताना भरपूर पाणी प्या आणि साखरयुक्त पेयांचे सेवन टाळा ज्यामुळे जलद निर्जलीकरण होते.
- थकवा, डोकेदुखी, स्नायूंमधील वेदना आणि चक्कर येणे यासारख्या निर्जलीकरणाच्या लक्षणांकडे लक्ष द्या.
- अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करा.
- शर्करायुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित करा. यातुन कमी पौषणमूल्य आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होऊ शकतात.
- फळे, सुकामेवा किंवा दही यांसारखे निरोगी पदार्थांचे सेवन करा.
उष्णतेपासून बचाव कसा कराल?
- घराबाहेर जाण्यापूर्वी कमीतकमी 15 मिनिटे आधी तुमच्या मुलांच्या उघड्या त्वचेवर SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन लावा.
- दर दोन तासांनी किंवा जास्त वेळा पोहल्यानंतर किंवा घाम आल्यावर पुन्हा सनस्क्रीन लावा.
- टोपी, सनग्लासेस आणि सैलसर सुती कपडे यासारखे कपडे घाला.
पाण्यात खेळताना घ्यायची सुरक्षा -
- आपल्या मुलाला पाण्याच्या जवळ कधीही लक्ष न देता सोडू नका, अगदी काही क्षणासाठी देखील.
- तुमच्या मुल पोहताना त्याच्यास आजूबाजूस एखादी प्रौढ व्यक्ती असेल याची काळजी घ्या.
- मुलांना पाण्याची सुरक्षेची मूलभूत कौशल्ये शिकवा जसे की तरंगणे आणि पोहण्याचे तंत्र शिकवा.
या उन्हाळ्यात सुरक्षा टिप्सचे पालन करून, तुम्ही तुमच्या मुलासाठी उन्हाळा आनंददायी बनवू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
संबंधित बातम्या