Hairy Tongue: सिगारेटचं व्यसन आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं आपण सर्वच जाणतो. सिगारेटच्या पाकिटावरही तसं नमूद केलेलं असतं. एवढंच नाहीतर प्रशासनाकडून जाहीरातींद्वारेही याबाबत जनजागृती केली जाते. पण तरीही काहीजण सिगारेट पिणं सोडत नाहीत. पण आता सिगारेटमुळे होणाऱ्या आजारानं सगळ्यांची झोप उडवली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, जास्त सिगारेट प्यायल्यानं किंवा तंबाखूचं अतिसेवन केल्यानं तुम्हाला एक असा आजार जडू शकतो, ज्यामध्ये तुमची जीभ पूर्णपणे हिरवी होती. एवढंच नाहीतर तुमच्या जिभेवर केसही येतात. ऐकूनच अंगावर काटा आला ना? जाणून घेऊयात नेमका हा आजार काय आहे? त्याबाबत सविस्तर...
कोणता आजार आहे हा?
हा आजार अत्यंत घातक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजाराची लक्षणं सांगायची तर, तुमची जीभ पूर्णपणे हिरवी होते आणि संपूर्ण जिभेवर केस येतात. असंच एक प्रकरण अमेरिकेत समोर आलं आहे. अमेरिकेतील ओहायोमध्ये एका व्यक्तीच्या जिभेला सर्वात आधी खूप खाज येऊ लागली. त्यानंतर हळूहळू त्या व्यक्तीच्या जिभेवर केस आले आणि कालांतरानं संपूर्ण जीभ पूर्णपणे हिरवी झाली. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जास्त सिगारेटचं सेवन केल्यानं हा आजार जडू शकतो. दरम्यान, अद्याप हा गंभीर आजार भारतात पाहायला मिळालेला नाही. तसेच, भारतातील कोणतीही व्यक्ती या आजारानं ग्रस्त असल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाही. परंतु, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा आजार सिगारेट किंवा तंबाखूचं अतिसेवन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्ती तंबाखूचं अतिसेवन करतात किंवा प्रमाणापेक्षा जास्त सिगारेच ओढतात त्यांनी वेळीच सावध व्हावं, असा इशाही तज्ज्ञांनी दिला आहे.
हा आजार होण्यास अँटीबायोटिकही कारणीभूत?
एकीकडे डॉक्टर्स हा आजार होण्यासाठी सिगारेटचं अतिसेवन कारणीभूत असल्याचं सांगत आहेत. तर, दुसरीकडे काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की, या व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी आपल्या दाढीचं दुखणं आणि दातांमधील इन्फेक्शनमुळे अँटिबायोटिक्सचा डोस घेतला होता. त्यामुळे व्यक्ती ज्या आजारानं ग्रासला गेला आहे, त्याचं कारण अँटिबायोटिक्समुळे झालेलं रिअॅक्शनही असू शकतं. दरम्यान, या आजाराबाबत अद्याप ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. तसेच, हा आजार अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनानंच झालाय, असा दावा करता येईल, अशी कोणतीही बाब समोर आलेली नाही. दरम्यान, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, हा आजार तंबाखू आणि सिगारेटच्या अतिसेवनानंच होत असल्याचं म्हटलं आहे.