Eyes flutter: आपल्या समाजात डोळे फडफडण्याच्या संबंधित अनेक समज आहेत. काही लोक डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानतात, तर काही लोक डावा डोळा फडफडणे हे अशुभ लक्षण मानतात. बरेच लोक डोळे फडफडणे हे पुढे घडणाऱ्या घडामोडींचे संकेत आहे असं मानतात. परंतु हे सत्य नसून डोळे फडफडण्यामागे काही कारणं असतात. डोळे फडफडण्यामागची काही वैज्ञानिक कारणं आज आपण जाणून घेणार आहोत.


डोळे कोरडे पडणे


डोळ्यातील कोरडेपणा हे देखील त्यांच्या फडफडण्यामागचं एक कारण आहे. डोळे कोरडे पडले तर ही समस्या उद्भवते. याशिवाय अ‍ॅलर्जीमुळे किंवा डोळ्यात जास्त पाणी साचल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. डोळे वारंवार कोरडे पडत असतील तर तुम्ही डोळ्यांचा ड्रॉप (Eye Drop) वापरुन ही समस्या दूर करु शकता.


पुरेशी झोप नसणे


तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तरीही ही समस्या दिसून येते. जर तुम्ही एखादे पुस्तक वाचले असेल किंवा बराच वेळ जागे राहिल्यानंतर एखादा चित्रपट पाहिला असेल, ज्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप येत नसेल, तर यामुळेही तुमचे डोळे फडफडू शकतात. कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळेही असे होऊ शकते.


स्नायू समस्या


वारंवार डोळे फडफडत असतील तर तुम्हाला डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित काही समस्या असू शकतात. जर तुमचे डोळे सतत फडफडत असतील तर एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या. तुमच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झाला आहे का, याचीही एकदा तपासणी करुन घ्या.


तणाव हे देखील आहे कारण


जास्त तणावामुळेही डोळे फडफडू शकतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असाल आणि सतत त्याबद्दल विचार करत असाल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे तुमचे डोळे फडफडण्याची शक्यता असते. तणावामुळे अनेकदा झोपही वारंवार तुटते.


मॅग्नेशियमची कमतरता


मॅग्नेशियमची कमतरता (Lack of Magnesium) असतानाही डोळे फडफडू शकतात. याशिवाय चहा-कॉफी (Tea-Coffee), अल्कोहोल (Alcohol) किंवा ड्रग्जचे जास्त सेवन (Drugs Consumption) केल्यामुळेही ही समस्या उद्भवते. 


त्यामुळे डोळ्यांचे फडफडणे हे शुभ-अशुभ घटनांचे संकेत नसून त्यामागे ही काही कारणं असू शकतात. पुरातन विचारांप्रमाणे काही लोक आजही डोळ्यांच्या फडफडण्यामागे शुभ-अशुभ घटनांचाच अंदाज लावतात.


हेही वाचा:


Red River: रक्तासारखं पाणी आणि संध्याकाळी होतोय विचित्र भास, पेरू देशात वाहते 'खूनी' नदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण