Fungal Infections of the Skin : अनेकांना फंगल इन्फेकशनचा (Fungal Infections) त्रास असतो. हातावर अथवा त्वचेवर खाज येणे अथवा जखमामुळे अनेकजण त्रस्त होतात. त्यांचा हा आजार इंटरट्रिगो म्हणजेच त्वचेचा एक भाग दुसऱ्या भागावर घासल्यामुळे होणारी जळजळ असा असू शकतो. या विषयावर डॉ श्रद्धा देशपांडे, सल्लागार-प्लॅस्टिक,रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड एस्थेटिक सर्जन,वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल सांगतात की, सध्या अशी लक्षणे असलेले केसेस आठवड्यात सुमारे दहा ते 15 समोर येत आहेत. त्या पुढे सांगतात कि पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. बुरशीजन्य संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस रॅशेस म्हणून ओळखला जातो. जे नाण्यासारख्या गोल किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सामान्यत: शरीराच्या गुप्तांगात, त्वचेच्या दुमडल्या भागात, मांडीच्या सांध्यात, बगले मध्ये ही वर्तुळे तयार होतात.
शरीरातील ज्या भागात कायम घाम येतो किंवा शरीराचा जो भाग कायम ओलसर असतो शक्यतो असल्या भागात अधिक आणि वारंवार हि वर्तुळे तयार होत असतात. ओलावा बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि त्यामुळे संसर्ग वाढतो. हि वर्तुळे हात-पायांच्या बोटांमध्ये तसेच पायाच्या तळव्यात देखील होऊ शकतात. पाय जास्तवेळ ओलसर बुटांमध्ये राहिल्याने देखील हे होते, या अवस्थेला "अँथलिट फुट" असेही म्हणतात. बोटे आणि नखांमध्ये बुरशीजन्य संसर्गामुळे नखे विकृत होऊ शकतात याला "पॅरोनिचिया" म्हणतात.
बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांमध्ये विशिष्ठ अँटीफंगल क्रीम आणि डस्टिंग पावडर तसेच तोंडावाटे अँटीफंगल औषधे पेशंटला दिली जाते.
ओलसर हवामानात हे संक्रमण अधिक प्रमाणात होते. त्यासाठी आंघोळी नंतर तसेच हात-पाय धुतल्यानंतर ते व्यवस्थित सुती कपड्याने कोरडे करणे चांगले असते, ज्या व्यक्तीस संसर्ग आहे त्याचे कपडे वेगळे धुणे, तसेच कपडे घालण्यापूर्वी ते इस्त्री करणे चांगले असते.
नेहमी स्वच्छ कपडे घाला कारण बुरशीचे बीजाणू कपड्यांवर जास्त काळ चिकटू शकतात, विशेषत: जेव्हा ते धुतलेले नसतात.
खूप घट्ट कपडे घालणे टाळा कारण ते तुमच्या त्वचेला हवेचा प्रवाह कमी करू शकतात आणि स्थानिक घाम वाढवू शकतात, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. सुती कपड्यांना प्राधान्य द्या.
प्रभावित भागात खाजवणे टाळा कारण यामुळे संसर्ग वाढू शकतो आणि पसरण्याची शक्यता देखील वाढते. अशा प्रकारे काळजी घेतल्यास संक्रमण टाळण्यास मदत होऊ शकते.