Sabudana Thalipeeth Recipe: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) सर्वांचाच उपवास असतो आणि उपवास म्हटलं की आपल्याला मोजकेच पदार्थ आठवतात. उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी (Sabudana Khichadi), साबुदाण्याचे वडे (Sabudana Wade), भगर (Bhagar), रताळे (Sweet Potato) असे उपवासाचे पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. बहुतांश लोक बनवायला साधी सोपी असणारी साबुदाण्याची खिचडीच बनवतात. उपवास म्हटलं की घरातल्या सर्वांना चटपटीत, चमचमीत पदार्थ खायला आवडतात आणि त्यातल्या त्यात साबुदाण्याचे पदार्थ म्हणजे सगळ्यांचेच आवडते. आषाढीनिमित्त घराघरात साबुदाण्याची खिचडी (Sabudana Khichadi) बनवण्याची तयारी सुरुच असेल, पण आपण आज साबुदाण्यापासून खमंग थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe) कसे बनवायचे हे जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया साबुदाण्यापासून खमंग थालिपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य...


साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य



  • भिजवून घेतलेले साबुदाणे - 3 वाट्या

  • उकडलेले बटाटे - 3

  • हिरव्या मिरच्या - 5 ते 6

  • शेंगदाण्याचा कूट - 1 वाटी 

  • मीठ - चवीनुसार 

  • तेल/तूप  - अंदाजानुसार

  • लिंबाचा रस - 1 चमचा

  • थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टिक शीट


साबुदाण्याचे थालिपीठ बनवण्याची कृती



  • सर्वप्रथम साबुदाणे पाण्यात भिजवून घ्यावे. उरलेलं पाणी काढून टाकून साबुदाणे 3 ते 4 तास चांगले भिजू द्यावे.

  • शेंगदाणे तव्यावर हलके भाजून हातावर चोळून त्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये कूट करुन घ्यावे.

  • हिरव्या मिरचीची देखील मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्यावी.

  • त्यानंतर बटाटे नीट उकडून घ्यावे आणि नंतर एका डिशमध्ये काढून कुस्करुन घ्यावे.

  • त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालावे. 

  • आता हे सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे.

  • तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्यावे.

  • या तयार पिठाचे थालिपीठ थापताना पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून ओला करुन अंथरावा. 

  • आता या प्लॅस्टिकवर किंवा ओल्या रुमालावर अलगद हातांनी थालिपीठ थापून घ्यावे, थालिपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.

  • गोलाकार आकारात थालिपीठ थापून घेतल्यांनंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्यावे.

  • थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.  

  • तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि मध्यम आचेवर थालिपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.  

  • उपवासासाठी तयार केलेले साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ दह्यासोबत सर्व्ह करावे.




हेही वाचा:


Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर