Maharashtra Epidemic Diseases : महाराष्ट्रात पुन्हा एकदा साथीच्या आजारांनी थैमान घातलं आहे. स्वाईन फ्लू (Swine Flu), हिवताप आणि डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. बारामतीतीत एका महिलेचा स्वाईन फ्लूमुळे पुण्यातील केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. तर, नागपुरात 24 तासांत स्वाईन फ्लूचे 16 रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या वातावरणात यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होत आहेत. पण, दरवर्षी पावसाळ्यानंतर येणाऱ्या साथींनी अजून पाठ सोडलेली नाही. मुंबईत स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यात महाराष्ट्रभरात स्वाईन फ्लूचं थैमान वाढत आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे
- तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे.
- गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.
कोणत्या आजारांचे किती रुग्ण?
मुंबईत ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 163 रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या 509 वर पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे 61 रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 105 झाली आहे.
आजार ऑगस्ट रुग्ण एकूण रुग्ण
हिवताप 509 2315
लेप्टो 46 146
डेंग्यू 105 289
गॅस्ट्रो 324 3909
कावीळ 35 353
चिकुनगुनिया 2 9
स्वाईन फ्लू 163 272