Health Tips : आयुर्वेदात सांगितल्यानुसार आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक समस्यांवर आवळा गुणकारी उपाय ठरतो. नियमित आवळा सेवन करणारी लोकं चिरतरुण राहतात, असे म्हटले जाते. इतकेच नाही तर, केस, त्वचा, पोट आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. आवळ्याप्रमाणेच मध देखील आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड लाभदायी आहे. आवळा आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास आरोग्याला आणखीन फायदे मिळू शकतो.


तुरट आवळ्यासोबत मध चवीलाही चांगला लागतो. अशावेळी आवळा पावडर मधात मिसळून त्याचे सेवन करता येते. रात्री गरम पाण्यासोबत आवळा आणि मध यांचे मिश्रण खाल्ल्याने पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होतात. या दोन्ही गोष्टी अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहेत. चला तर, जाणून घेऊया आवळा आणि मध एकत्र खाण्याचे फायदे...


आवळा आणि मध मिसळून खाण्याचे फायदे :


रक्तातील साखर नियंत्रणात राहते : आवळा पावडर मधासोबत मिसळून खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित राहते. मधात नैसर्गिक गोडवा असला, तरी आवळ्यामध्ये आढळणारे घटक मधुमेह नियंत्रित करतात. यासाठी मधुमेह रुग्ण देखील आवळा पावडर मधात मिसळून खाऊ शकतात.


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल : आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळेच आवळा मधात मिसळून खाल्ल्याने अनेक संसर्ग दूर राहतात. आवळा खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. मध आणि आवळा एकत्र मिसळून खाल्ल्याने अनेक रोग दूर राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.


पचनशक्ती मजबूत होते : आवळा पावडर आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास पचनक्रिया देखील सुरळीत होते. पोटाच्या समस्यांसाठीही हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आवळा खाल्ल्याने अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते. आवळा व मधाच्या नियमित सेवनाने चयापचय आणि भूक देखील वाढते.


सर्दी-खोकला दूर होईल : जे लोक आवळा नियमितपणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खातात, त्यांना सर्दीचा त्रास इतरांच्या तुलनेत कमी होतो. सर्दी-खोकला होत असल्यास मध आणि आवळा यांचे चाटण बनवून दिवसातून दोनवेळा, सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्यास फायदा होतो.


दीर्घकाळ तरूण दिसाल : आवळा खाणाऱ्या लोकांना केसांशी संबंधित समस्या येत नाहीत. शिवाय केसही लवकर पांढरे होत नाहीत. आवळा आणि मध नियमित सेवन करणाऱ्या लोकांच्या त्वचेवर चमक दिसते. आवळा खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवत नाही.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :