Diabetes Most Common Symptoms Blurred Vision : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Stressful lifestyle) शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक मधुमेह. म्हणजेच, डायबिटीज (Diabetes). भारतासह (India) जगभरात डायबिटीज ही गंभीर समस्या बनली आहे. स्वादुपिंडात पुरेसं इन्सुलिन (Insulin) तयार होत नसल्यामुळे ब्लड स्ट्रीममध्ये साखर वाढू लागते आणि डायबिटीज जडतं.
मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत. टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह. दोघांमध्ये टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. आता अनेकांच्या मनात येणारा प्रश्न मधुमेह झालाय ओळखणार कसं? तसं पाहायला गेलं तर मधुमेहाची अनेक लक्षणं आहेत. अलिकडेच काही तज्ज्ञांनी सांगितलं की, मधुमेहाची सामान्य लक्षणं डोळ्यांमध्येही दिसू शकतात.
TheMirror च्या मते, जर तुम्हाला अंधुक दिसत असेल किंवा जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. डायबिटीज मेलेटस किंवा फक्त डायबिटीजमुळेच, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. पण हे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळेही होऊ शकतं. परंतु साखरेची पातळी स्थिर झाल्यावर किंवा सामान्य श्रेणीत परत येताच, दृष्टी सामान्य झाली पाहिजे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, अशीच एक समस्या म्हणजे, डायबेटिक रेटिनोपॅथी, जी आता नोकरीधंदा करणाऱ्या प्रौढांमध्ये अंधत्व येण्याचं प्रमुख कारण आहे.
अस्पष्ट दिसंत असेल तर काय करावं?
तुम्हाला अचानक अस्पष्ट दिसू लागल्यास, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. शक्य तितक्या लवकर तुमचे डोळे तपासण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची भेट घ्या. तसं फार काळजी करण्यासारखं काही नाही. डायबिटीज व्यतिरिक्त इतर अनेक समस्यांमुळेही डोळ्यांची दृष्टी अस्पष्ट होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला अस्पष्ट दिसू लागलं तर तुम्हाला डायबिटीज झालंय असा त्याचा अर्थ होत नाही. अस्पष्ट दिसण्यासाठी मोतीबिंदू, मायग्रेन आणि वयानुसार उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांचं कारण ठरू शकतात.
मधुमेह असल्यास डोळ्यांना या समस्या जाणवतात
- दृष्टी धूसर होणे किंवा अस्पष्ट दिसणे किंवा प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे
- रंग नीट ओळखता न येणे
- रंगांमधील वा आकारातील भेद ओळखण्याची क्षमता कमी होणे
- दृष्टीमध्ये काळे ठिपके दिसणे
- सरळ रेषा लहरींसारख्या किंवा वाकड्यातिकड्या दिसणे
- दूरचे पाहण्यास त्रास होणे
- हळूहळू नजर कमी होत जाणे
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.