Diabetes Health Tips : सध्याच्या जीवनशैलीमध्ये पाहिल्यास मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत चालले आहे. बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा असलेला अभाव यामुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे मधुमेहाच्या रूग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पण मधुमेह नेमका का होतो? त्यामागील लक्षणं आणि कारणं कोणती? तसेच, यावर उपचार काय या संदर्भात अधिक माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.


मधुमेहाचा आजार आणि त्यावरील उपचारा संदर्भात तज्ञ डॉ. अमित असलकर यांनी माहिती दिली आहे.   


मधुमेहाची लक्षणं आणि कारणं (Diabetes Symptoms and Causes) :


सध्याच्या काळात मधुमेह हा खूप कमी वयात व्हायला लागला आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. पूर्वीच्या काळात लोक कष्ट करायचे आता कष्ट करणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. आणि एकाच जागेवर बसून काम करण्याची कार्यपद्धती यामुळे देखील मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. त्याच बरोबर अनुवंशिकता हेदेखील मधुमेहामागचे एक मूळ कारण आहे.


वजन झपाट्याने कमी होणे, खूप तहान आणि भूक लागणे, वारंवार लघवीला होणे, अतिशय थकवा जाणवणे, सतत इन्फेक्शन होणे, जखम लवकर बरी न होणे, दृष्टीदोष, धुरकट दिसणे, वारंवार गर्भपात होणे, क्षयरोग होणे, मानसिक ताण किंवा नैराश्य येणे ही लक्षणं आहेत. 


मधुमेहावर योग्य उपचार काय? (Diabetes Treatment) :


मधुमेहाचा उपचार हा रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. याबरोबरच योग्य आहार आणि पत्थ्य पाळणे, व्यायाम करणे हेदेखील खूप गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य वेळेस उपचार सुरु केल्यास मधुमेह आटोक्यात येऊ शकतो. ज्यांना हा आजार 8-10 वर्षांपेक्षा अधिक काळ असतो किंवा रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यांना इन्सुलिनची ट्रीटमेंट घ्यावी लागते. 


मधुमेह होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्याल? 


बऱ्याच लोकांच्या मनात चुकीचा समाज आहे की, मधुमेह हा फक्त अनुवंशिक आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह हा कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाला टाळण्यासाठी अधूनमधून शुगर तपासात राहणे, आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढविणे, दिवसातून एक-दीड तास व्यायाम करणे, आहारात कार्बोहैड्रेट वाढवणारे पदार्थ जसे की, चपाती, भाकरी, भात यांचे प्रमाण कमी कमी करून डाळी, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळं इत्यादींचा जास्तीत जास्त समावेश करणे.


पाहा व्हिडीओ : 



महत्वाच्या बातम्या : 


High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त राहिल्यास जेवणानंतर 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा; त्रास होणार नाही