World Diabetes Day 2022 : भारतामध्ये 77 दशलक्ष लोक डायबेटिस अर्थात मधुमेहाने ग्रस्त आहेत. आणि त्यातील अंदाजे 18 टक्के मधुमेही डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) या आजाराचा सामना करत आहेत. हा आकडा अत्यंत चिंताजनक असूनही भारतामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) सारख्या मधुमेहाच्या परिणामी उद्भवणाऱ्या गंभीर आणि अपरिवर्तनीय आजारांविषयी फारशी जागरुकता दिसून येत नाही.
डीआर हा आजार कार्यक्षम प्रौढ व्यक्तींमध्ये (20-65 वर्षे वयोगटातील) उद्भवणाऱ्या अंधत्वामागचे सर्वात आघाडीचे कारण आहे आणि जगभरात दर 3 पैकी एका व्यक्तीला डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) हा आजार जडत असल्याचे दिसते. नियमित नेत्रतपासणी, विशेषत: मधुमेही आणि वयोवृद्ध व्यक्तींनी नियमितपणे डोळे तपासून घेणे हाच या आजारांचे वेळेवर निदान होण्यासाठीचा आणि आजाराच्या व्यवस्थापनासाठीचा खात्रीचा मार्ग आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यावर मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याची परिणती नेत्रविकारात होणे टाळण्यासाठी औषधोपचारांचे काटेकोर पालन करणे आणि निरोगी जीवनशैली जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मधुमेहींची संख्या वाढत असताना प्रत्येक 3 मधुमेहींपैकी एका व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) आजार जडतो असा अंदाज आहे आणि आजही ते तरुण, कार्यक्षम वयातील प्रौढ व्यक्तींमधील अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. “आजच्या काळातील युवा मधुमेही या आजाराविषयी व त्यावरील उपचारांविषयी अधिक जागरुक आहेत, मात्र त्यांच्या विद्यमान जीवनशैलीमुळे त्यांना आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवता येत नाही. आज, आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतींमुळे डायबेटिक रेटिनोपॅथी आजार बळावण्याचा वेग मंदावता येतो, प्रसंगी रोखताही येतो, ज्यामुळे मधुमेहींमधील अंधत्व टाळता येते.” मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ व्हिट्रिओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी सांगतात.
मधुमेहाचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे हे कसे ओळखाल?
अनियंत्रित मधुमेहामुळे डीआर, मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या लेन्सवर एक दुधी पापुद्रा तयार होणे आणि डोळ्यांच्या नसांचे नुकसान करणाऱ्या ग्लुकोमासारखे अनेक नेत्रविकार उद्भवू शकतात. मधुमेहामुळे तुम्हाला असे आजार होण्याची शक्यता खूपच वाढते किंवा तरुण वयातच हे आजार तुम्हाला गाठू शकतात.
त्यामुळे आपण अत्यंत सतर्क राहिले पाहिजे आणि पुढीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास ऑप्थॅल्मोलॉजिस्ट किंवा रेटिना विशेषज्ज्ञांची भेट घेतली पाहिजे.
· दृष्टी धूसर होणे किंवा अस्पष्ट दिसणे किंवा प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे
· रंग नीट ओळखता न येणे
· रंगांमधील वा आकारातील भेद ओळखण्याची क्षमता कमी होणे
· दृष्टीमध्ये काळे ठिपके दिसणे
· सरळ रेषा लहरींसारख्या किंवा वाकड्यातिकड्या दिसणे
· दूरचे पाहण्यास त्रास होणे
· हळूहळू नजर कमी होत जाणे
14 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा जागतिक मधुमेह दिन, म्हणजे मधुमेहाशी संबंधित रेटिनाच्या वाढत्या मात्र प्रतिबंध करता येण्याजोग्या आजारांविषयी जागरुकता निर्माण करण्याची एक सुसंधी असते. यामुळे वेळेवर केलेले निदान आणि आजाराचे व्यवस्थापन यांच्या माध्यमातून या आजारांची वेळच्यावेळी देखभाल होण्यास चालना मिळू शकते, जेणेकरून रुग्णांना टाळता येण्याजोग्या अंधत्वास प्रतिबंध करता यावा.
महत्वाच्या बातम्या :