Dengue: भारतात सध्या डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं एडिस इजिप्ती ही डासांची प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत डेंग्यूची लक्षणं (Dengue Symptoms) दिसू लागतात आणि त्यानंतर 2 ते 7 दिवसांपर्यंत ही लक्षणं कायम राहतात. डेंग्यूने बाधित असणाऱ्या रुग्णांना 102 ते 104 अंश सेल्सिअसपर्यंत ताप (High Fever) येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


काय आहेत डेंग्यूची लक्षणं?


डेंग्यू तापाच्या पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून येते आणि तीव्र ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, अशक्तपणा जाणवणं, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणं, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणं दिसू शकतात. या तापामध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. 


डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्य सरकारदेखील ठोस पावलं उचलत आहेत. अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदूवर, फुप्फुसांवर किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते.  त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


डेंग्यू होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूची दुसरी लागण टाळायची असेल, तर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. डासांच्या अळ्यांना जन्म घेण्यापासून रोखण्यासाठी घरात घाण पाणी साचू देऊ नका. जेथे पाणी साचतं तेथे कीटकनाशकाची फवारणी करत राहा. डेंग्यूच्या डासांच्या चावण्यापासून स्वतःचं संरक्षण करत रहा. शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या.


डेंग्यूवर नेमके उपचार काय?


डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर लक्षणं दिसून आल्यास आणि योग्य वेळी त्यावर उपचार घेण्यास सुरुवात केल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. ताप कमी होणाऱ्या आणि वेदनाशामक गोळ्या किंवा औषधं घेऊन लक्षणं कमी करता येऊ शकतात. डेंग्यूच्या रुग्णाने भरपूर पाणी प्यावं. डेंग्यूचे रुग्ण हे 3 ते 8 दिवसांत बरे होतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास ते वाढवणारे खाद्यपदार्थ खाण्याची गरज असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


हेही वाचा:


Ajit Pawar Dengue : अजित पवारांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती