Coronavirus JN.1 Varaint Symptoms : जगभरात कोरोना (Corona) विषाणूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या नव्या JN.1 सब-व्हेरियंटमुळे (JN.1 Sub-Variant) डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या (Covid-19) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा (Corona Variant) नवा सब-व्हेरियंट JN.1 मुळे देशासह जगभरात नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे JN.1 सब-व्हेरियंट हा ओमायक्रॉन या सर्वाधिक संसर्गजन्य प्रकारातील आहे, त्यामुळे याचा संसर्ग वेगाने होत आहे. देशासह जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण नवीन JN.1 सब-व्हेरियंटचे आहेत.
कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे डोकेदुखी वाढली
आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कोरोनाचा नवा JN.1 व्हेरियंट दिवसेंदिवस लक्षणे बदलतोय. गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. या व्हेरियंटचा संसर्ग वेगाने होत असला, तरी आतापर्यंत बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे व्हायरल फ्लू किंवा इतर श्वसन आजाराशी संबंधित आहेत.
'या' व्यक्तींना नव्या व्हेरियंटचा धोका सर्वाधिक
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहता धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हे धोक्याचं लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका वाढतो. या नवा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोन्ही विषाणूंमध्ये साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य आहेत. या विषाणूचे जसजसे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. तसतसा हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत असल्याचे दिसून येत आहे.
रोगप्रतिकारक प्रणालीपासून बचाव करण्यात पटाईत
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) दाव्यानुसार, JN.1 व्हेरियंट एकतर अधिक संसर्गजन्य आहे किंवा आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीपासून बचाव करण्यासाठी अधिक कार्यक्षम आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकारचा इशारा
कोविड रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आणि JN.1 उप-प्रकार आढळल्यामुळे, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येत आहेत. याशिवाय, या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.