Covid-19 : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात वाढताना दिसत आहे. कोरोनाचं डबल म्युटेंट व्हायरस आता लहान मुलांनाही आपल्या विळख्यात अडकवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यासाठी हा आजार अत्यंत धोकादायक ठरु शकतो. लहान मुलं आपल्याला नक्की काय होतंय, हे सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नक्की काय होतंय हे तत्काळ जाणून घेणं कठिण होतं. म्हणून वाढत्या कोरोना काळात मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. 


लहान मुलं जर कोरोनाच्या विळख्यात अडकली, तर त्यांच्यावर उपचार करताना अनेक मर्यादा येतात. त्यांना प्रत्येक औषध देता येत नाही. रेमडेसिवीर सारखी औषधं लहान मुलांना देता येत नाहीत. त्यामुळे सावध राहून मुलांची काळजी घेतल्यामुळे लहान मुलांना सुरक्षित ठेवता येऊ शकतं. जाणून घेऊया लहान मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय. 


कोरोनापासून मुलांना असं ठेवा सुरक्षित : 


1. सर्वात महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मुलांना मास्क लावा, तसेच मास्क काढू देऊ नका. 
2. जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल, तर मुलांनाही सोशल डिस्टन्सिगबाबत माहिती द्या. 
3.  कोरोना प्रादुर्भावत मुलांना घराबाहेर पाठवणं शक्यतो टाळा. 
4. मुलांना हात धुणं, सोशल डिस्टन्सिग, मास्कचा वापर यांसारख्या कोरोना नियमांची माहिती द्या. 
5. मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणं


1. लहान मुलांना 1-2 दिवसांहून अधिक काळ ताप येणं. 
2. मुलांच्या शरीरावर किंवा पायांवर लाल चट्टे उठणं. 
3. चेहऱ्याचा रंग निळसर दिसणं
4. मुलांना उलट्या किंवा जुलाब होणं
5. मुलांच्या हाता-पायांना सूज येणं


या टिप्स ठरतील फायदेशीर : 


1. फुफ्फुसांचा आरोग्य उत्तम राखण्यासाठी फुफ्फुसांचा व्यायाम करणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी काही खेळांमार्फत मुलांकडून तुम्ही हे व्यायाम करुन घेऊ शकता. मुलांना फुगे फुगवण्यासाठी द्या. 
2. मुलांना पिण्यासाठी कोमट पाणी द्या, यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. 
3. जर मुलं थोडी मोठी असतील आणि सांगितलेलं ते करु शकत असतील तर त्यांना प्राणायाम शिकवा. 
4. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'व्हिटॅमिन सी'चा मुबलक साठा असणारी फळं खायला द्या. 
5. मुलांना बॅक्टेरियल इंफेक्शन आणि व्हायरल इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी हळदीचं दूध द्या. 
6. मुलांना या आजाराबाबत माहिती द्या आणि त्यांना गोष्टी समजावून सांगा.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :