Clove Tea Health Benefits : आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे गरम मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक गरम मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. लवंग हा गरम मसाल्याचा पदार्थही प्रत्येक स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. पण, इवल्याशा लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुम्ही लवंगाचा चहा पिऊन त्याचे सेवन केल्यासही तुम्हाला अनेक फायदे मिळतील. याबाबत सविस्तर जाणून घ्या.


लवंगाचा चहा तयार करण्याची पद्धत


लवंगाचा चहा तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये एक कप पाणी घ्या. उकळत्या पाण्यात 4-5 लवंग कुटून टाका. यामध्ये थोडंसं आलं किसून टाका. यासोबत थोडीशी दालचिनीही टाका. चहा छान उकळवून घ्या. आता हा गाळून यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. 


लवंगाचे फायदे


लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आणि अँटीएनफ्लामेंट्री (Anti-Inflammatory) गुणधर्ण असतात. याचा सेवनामुळे पोट फुगणे, मळमळ, अपचन, उलट्या, जठरासंबंधी चिडचिड, अतिसार असे पोटाशी संबंधित आजारातून लवकर सुटका होते. यासोबतच सर्दी, खोकला, ब्राँकायटिस, सायनुसायटिस, दमा यासारख्या श्वसनविकारांवरही लवंग रामबाण उपाय आहे.


पचनक्रिया सुधारते


लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे पचनाला मदत होते.


तोंडीची दुर्गंधी दूर होते


लवंगाच्या सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. लवंगामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे तोंडातील सूक्ष्म बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. याशिवाय हिरड्यांसंबंधित समस्याही दूर होतात. लवंगाचा चहा रोज प्यायल्याने तोंडाशी संबंधित आजार दूर होतात. हिवाळ्यात लवंगाचा चहा प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.


लवंग चहा पिण्याची योग्य वेळ


लवंग चहा कधी प्यावा या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.



  • जेवल्यानंतर पोटदुखी किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही लवंग चहा पिऊ शकता. याच्या सेवनाने तुमची अपचन किंवा गॅसची समस्या दूर होईल.

  • नाश्तानंतर लवंग चहा प्यायल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. 

  • रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचा चहा प्यायल्याने मन शांत राहते आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Apple Cider Vinegar : वजन कमी करण्यासह त्वचेची चमक वाढवेल, ॲपल सायडर व्हिनेगरचे भन्नाट फायदे