Heart Attack in Kids : सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे (Health) लक्ष देणं फार गरजेचं झालं आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो. आपण अनेकदा वृद्धांमध्ये, तरूणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचं ऐकलं आहे. पण, लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता दिसू लागला आहे. याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी आला. गुजरातमध्ये नुकतीच एक वेदनादायक घटना समोर आली आहे. शाळेत जेवणाच्या सुट्टी दरम्यान एका विद्यार्थ्याला पायऱ्यांवर हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच, यावर्षी एप्रिलमध्ये तेलंगणातील एका गावात 13 वर्षांच्या मुलीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. देशातील लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या संख्येने सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. आतापर्यंत पालक मुलांच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल निश्चिंत असायचे, पण आता अशा घटनांनी पालकही चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय. याच संदर्भात तज्ज्ञांकडून मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  
 
जन्मापासूनच मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका असतो का?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असतो. जेव्हा आई गरोदर राहते, तेव्हा मुलांना जन्मजात हृदयविकाराची झळ बसते आणि त्यांना याच भीतीने आयुष्य काढावं लागतं. या आजारात हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्त प्रभाव पडतो. हा हृदयविकाराचा सर्वात मोठा धोका असतो. 
 
निष्काळजीपणामुळे मुले हृदयविकाराला बळी पडत आहेत का?


या संदर्भात आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, सुदृढ बालकेही जन्माच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. पालकांचा निष्काळजीपणाही यामागे एक कारण असू शकतं. मुलांसमोर धुम्रपान, खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा, अस्वास्थ्यकर जीवनशैली, मुलांना खेळण्यासाठी न पाठवणे, अभ्यासाचा दबाव अशा अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल यांसारखे आजार मुलांमध्ये दिसून येत असून त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
 
मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कोणती?



  • त्वचा किंवा ओठ निळसर रंगाचे होतात

  • खाण्यास त्रास होणे

  • धाप लागणे

  • थोडं जरी चालले तरी धाप लागणे 

  • योग्यरित्या मुलांची वाढ न होणे 

  • चक्कर येणे, सांधेदुखी आणि छातीत दुखणे


 मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसल्यास काय करावे?



हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब मुलांना डॉक्टरांकडे नेऊन तपासण्या कराव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे आहार आणि जीवनशैली सुरु ठेवावी. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर