Child Eating Soil is Dangerous : बहुतेक लहान मुलांना (Childres) माती (Soil) खाण्याची सवय असते. माती खाणे चिमुकल्यांना फार आवडते. या आवडीचे रुपांतर कालांतराने सवयीमध्ये होते. लहान मुलांची ही सवय सोडवताना पालकांची मात्र नाचक्की होते. अनेक उपाय करुनही मुलांची माती खाण्याची सवय सुटतं नाही. तर ही फार चिंताजनक बाब आहे. तुमच्या मुलांची माती खाण्याची सवय वेळीच बदलणे आवश्यक आहे. नाहीतर याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. माती खाल्ल्याने मुलांना बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर त्यांना पोटाशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतात. तुमची मुलं माती खातायत? आणि तुम्हाला तुमच्या मुलांची ही वाईट सवय सोडवायची असेल, तर आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत. कसं ते वाचा...


लहान मुले माती का खातात?


लहान मुलं माती का खातात हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? मातीची चव लहान मुलांना का आवडते, त्यांना याची सवय का लागते. यामागेही कारण आहेत. शरीरात कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे मुलांना माती खाण्याची सवय लागते. काहीवेळा खाण्यासंबंधित विकारामुळे (Eating Disorder) ही सवय लागते. तर काही वेळा मुले कुतूहलामुळे माती खायला सुरुवात करतात. लहान मुले कुतूहलापोटी, प्रत्येक गोष्ट तपासण्यासाठी उत्सुक असतात. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये, माती खाण्याची सवय ही कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवते.


मुलांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक


सुरुवातीला लहान मुलांचे माती खाणे याकडे पालकही कुतूहल आणि प्रेमाने पाहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर मुलांना त्याची सवय लागते. पण मुलांच्या माती खाण्याच्या सवयीचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे त्यांना पोट आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. लहान मुलांच्या या सवयीला वेळीच आळा घातला नाही, तर यामुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल.


'हे' उपाय करून मुलांची माती खाण्याची सवय सोडवा.


नॉन-फूड आयटम देऊ नका


मुलांना नॉन-फूड आयटम देऊ नका. लहान मुलांना पोषक तत्त्वे नसणारे अन्नपदार्थ देणे टाळा. मुलांना अन्नपदार्थ देताना त्यांच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल याची काळजी घ्या. मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि तुमच्या स्वतःच्या काही सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा. 


मुलांना केळी खायला द्या


केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. मुलांना रोज केळी खायला द्यावी. त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण होईल आणि माती खाण्याची सवय हळूहळू सोडण्यासाठी मदत होईल. केळी मधात मिसळूनही मुलांना खायला देऊ शकता.


कॅल्शियमयुक्त आहार द्या


मुलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की त्यांना मातीची चव आवडू लागते. मुलांनी माती खाऊ नये, यासाठी त्यांना पुरेसे कॅल्शियम असेल, अन्नपदार्थ खायला द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कॅल्शियमची औषधेही दिली जाऊ शकतात.


लवंग आहे प्रभावी 


मुलांना माती खाण्याची सवय लागली असेल आणि ही सवय सोडवायची असेल तर त्यांना लवंगाचे पाणी देणे फायदेशीर ठरेल. सहा ते सात लवंगा एक कप पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळा आणि हे पाणी मुलांना प्यायला द्या. हा उपाय केल्यास काही दिवसातच मुले माती खाणे बंद करतील.


Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.