Symptoms and Prevention of Prostate Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना प्रोस्टेट कॅन्सरचं (Prostate Cancer) निदान झालं आहे. जसं महिलांमध्ये दिवसागणिक ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer), सर्वायकल कॅन्सरचं (Cervical Cancer) प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. जगभरात दिवसागणिक या कर्करोगाच्या (Cancer) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीमध्येच होतो. या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखता येत नाहीत. त्यामुळे या आजाराची बहुतेक प्रकरणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. इतर कॅन्सरच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सर शरीरात हळूहळू वाढतो. पूर्वी साठी गाठलेल्या पुरूषांमध्ये या कॅन्सरची लक्षणं आढळून यायची, मात्र आता पन्नाशी गाठलेल्या किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या पुरूषांमध्येही या कॅन्सरची लक्षणं आढळून येत आहेत. या कॅन्सरची लक्षणं सहज ओळखता येतात. एखाद्या व्यक्तीला लघवी करताना त्रास होत असेल, वारंवार लघवी करण्याची इच्छा होत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवत असेल, तर ही प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेवर तपासणी करून त्यावर सहज उपचार होऊ शकतात. 


प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय? (What is Prostate Cancer?)


प्रोस्टेट कॅन्सरच्या नावावरून तुम्हाला हे समजू शकतं की, हा पुरुषांच्या प्रजनन व्यवस्थेचा एक भाग असलेल्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा कर्करोग आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, प्रोस्टेट ही अक्रोडाच्या आकाराची ग्रंथी आहे, जी पुरुषाच्या मूत्राशयाच्या खाली असते. ही छोटी ग्रंथी पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या ग्रंथीमधून एक प्रकारचा द्रवपदार्थ स्रवला जातो, जे वीर्यामध्ये मिसळल्यावर शुक्राणू निरोगी ठेवतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया सुलभ करतं. हा कर्करोग केवळ प्रोस्टेट ग्रंथींपुरता मर्यादित असताना त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत शोधून काढल्यास, तो बरा होण्याची शक्यता जास्त असते. 


प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं काय? (What Are The Symptoms of Prostate Cancer?)



  • पाठदुखी 

  • वजन कमी करणं 

  • लघवी करताना त्रास होणं 

  • सतत लघवीला आल्यासारखं वाटणं

  • लघवी करताना जळजळ होणं 

  • शारीरिक संबंधांदरम्यान वेदना होणं किंवा इच्छा न होणं 

  • मूत्र किंवा वीर्यामध्ये रक्त येणं

  • मल किंवा मूत्र विसर्जन करण्यास असमर्थता 




रिस्क फॅक्टर्स काय? 


वय : वाढत्या वयानुसार प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. साधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर त्याचा धोका वाढतो.


लठ्ठपणा : लठ्ठ पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो. लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढतो.


आनुवंशिकता : अनुवांशिक कारणांमुळे काही लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो. ज्या पुरुषांच्या कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरची हिस्ट्री असेल, त्यांना जास्त धोका असतो. याशिवाय, जोखीम वेगवेगळ्या जातींच्या लोकांमध्ये देखील बदलते. कृष्णवर्णीय लोकांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका जास्त असतो.



प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव कसा कराल? (Prevention of Prostate Cancer)


वजन नियंत्रणात ठेवा : वजन वाढणं हे प्रोस्टेट कॅन्सर होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. 


हेल्दी डाएट : डाएटमध्ये सर्व फळांचा समावेश करा. याव्यतिरिक्त आहारात भाज्यांचा समावेश करा. त्यामुळे तुमचं शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. 


धुम्रपान करणं टाळा : धुम्रपान करणं आरोग्यसाठी अत्यंत घातक असतं. त्यामुळे धुम्रपान करू नका. 


व्यायाम करा : व्यायाम केल्यानं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढते, त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटांसाठी का होईना व्यायाम करा. 


तपासण्या करा : वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, नियमित तपासण्या करा. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचं निदान; बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती