मुंबई : सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ‘वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये दोन तासांत सगळ्या तपासण्या, निदान व उपचाराची दिशा ठरवण्यात येणार आहे. ‘जागतिक कर्करोग दिना’च्या दिवशी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन आज करण्यात आले.
वन-स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम उपचार पद्धती, रुग्ण केंद्रीत आणि क्लिनिकल तज्ज्ञ आणि लंडनमधील प्रसिद्ध गाय हॉस्पिटलचे क्लिनिकल लीड आणि ब्रेस्ट ट्यूमर ग्रुपचे प्रमुख डॉ. आशुतोष कोठारी यांच्या सहयोगाने उभारले आहे.
रिलायन्स फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष नीता मुकेश अंबानी म्हणाल्या, "आजच्या जागतिक कर्करोग दिनी मला एक भारतीय आणि महिला म्हणून सांगण्यास अभिमान वाटत आहे की आम्ही कर्करोगाविरोधातील लढाईत आमचा वाटा उचलत आहे. सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ‘वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून आम्ही प्रत्येक भारतीयाला जगातील सर्वोत्तम उपचार परवडणाऱ्या दरात देणार आहे.
महिला ह्या जन्मापासूनचं अष्टपैलू असतात. स्वतःच्या मुलांपासून घरातील काम सांभाळून त्या करीअरही करतात. आपलं खाजगी आयुष्य आणि व्यावसाय यात त्या कधीच सरमिसळ होऊ देत नाहीत. मात्र, यामुळे त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि हे आता बदलायला हवं. कारण, आपलं आरोग्य उत्तम राहिलं तरचं आपल्याला ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडता येणार आहेत. वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिकमध्ये जगातील सर्वोत्तम उपचार केले जाणार आहे. महिलांच्या या लढाईत आपणही त्यांना साथ देऊया.
स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या सर्व कर्करोगांपैकी 14 टक्के कर्करोग हा स्तनाचा असतो. शहरी भागात, 22 पैकी 1 महिलांना तिच्या जीवनकाळात स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
One-stop Breast Clinic | सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ‘वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक’ सुरू