Beauty: आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. विशेषतः महिलांसाठी सुंदर दिसणं महत्त्वाचं ठरतं. सर्वसाधारणपणे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन त्वचा आणि केसांशी संबंधित उपचार घेतात. त्याचवेळी एका महिलेला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांची ट्रिटमेंट करून घेणे महागात पडले. हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट घेणे एका महिलेसाठी महागात पडले आणि तिची किडनी निकामी झाली. सुंदर दिसणाच्या नादात अनेक महिला ब्युटी ट्रिटमेंट घेताना दिसतात. पण सुंदर बनवणाऱ्या या ब्युटी ट्रिटमेंट तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं.
हेअर स्ट्रेटनिंगमुळे किडनीला धोका?
तुम्हीही केस स्ट्रेट करण्यासाठी पार्लरमध्ये जाता का? तुम्ही केराटिन उपचार घेण्याचा विचार करत आहात? जर होय, तर काळजी घ्या. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सलूनमध्ये केस सरळ करण्याच्या उपचारांमुळे एका महिलेची किडनी निकामी झाली. या अभ्यासात महिलेच्या ओळखीचा उल्लेख नाही. मात्र, असे नोंदवले गेले आहे की तिचे केस सरळ केल्याने तिच्या किडनीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केराटिन हेअर ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे किडनीला धोका निर्माण होऊ शकतो.
अभ्यासात धक्कादायक खुलासा
अभ्यासानुसार, हेअर ट्रीटमेंट घेण्यापूर्वी 26 वर्षीय महिला निरोगी होती. जून 2020, एप्रिल 2021 आणि जुलै 2022 मध्ये केसांवर उपचार घेतल्यानंतर, चक्कर येण्याव्यतिरिक्त, तिला अतिसार, ताप आणि पाठदुखी यांसारख्या इतर समस्यांनी ग्रासले. महिला या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करत होती, परंतु नंतर असे आढळून आले की, केसांच्या उपचारामुळे महिलेच्या आरोग्यावर आणि किडनीवर परिणाम होत आहे.
केस सरळ झाल्यामुळे टाळूवर अल्सर
अभ्यासात असे नोंदवले गेले की महिलेने उपचारादरम्यान तिच्या डोक्यात जळजळ झाल्याची तक्रार केली. याशिवाय त्यांच्या डोक्यावर अल्सर होता. केसांच्या मुळांमध्ये संसर्ग झाल्यास, टाळूवर अल्सर झाल्याने वेदनादायक जखमा किंवा फोड येतात.
किडनीही निकामी झाली
महिलेची तपासणी केली असता, तिची किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांना समजले. रिपोर्टमध्ये रक्तातील क्रिएटिनिनची उच्च पातळी आणि लघवीत रक्त होते. सीटी स्कॅनमध्ये किडनीच्या संसर्गाची किंवा अडथळ्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती, ही वेगळी बाब आहे, परंतु लक्षणांवरून ते कळू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ग्लायऑक्सिलिक ॲसिड असलेल्या केराटिन आधारित केस स्ट्रेटनिंग उत्पादनांमुळे किडनी खराब झाली आहे. तुमच्या माहितीसाठी, महिलेने स्वतः डॉक्टरांना सांगितले की, तिचे केस ग्लायॉक्सिलिक ॲसिड असलेल्या स्ट्रेटनिंग क्रीमने स्ट्रेट केले आहेत. अशावेळी या रसायनामुळे महिलेच्या टाळूमध्ये जळजळ आणि अल्सरची समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उंदरांवर केले संशोधन
या संशोधनात डॉक्टरांनी उंदरांवर ग्लायऑक्सिलिक ॲसिड वापरले. याशिवाय इतर प्रकारच्या चाचण्याही करण्यात आल्या, त्यानंतर हे रसायन डोक्याच्या त्वचेतून किडनीपर्यंत पोहोचून त्याचे नुकसान करत असल्याची पुष्टी झाली.
हेही वाचा>>>
Gender Change: संजय बांगरच्या मुलानं केलेली लिंगबदल प्रक्रिया नेमकी काय असते? याचे धोके काय? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )