Winter Health Tips : सध्या तापमानाचा पारा घसरल्याचं दिसून येत आहे. थंडीच्या दिवसात हमखास सांधेदुखी (Joint Pain) आणि संधीवाताचा (Arthritis) त्रास जाणवतो. बहुतेक वृद्धांसाठी हिवाळा (Winter) अनेक समस्या घेऊन येतो. पण अनेक वेळा वेदनांची समस्या फक्त हवामानामुळेच नाही तर तुमच्या आहारावरही अवलंबून असते. अनेकांना सांधेदुखीमध्ये सूज आणि वेदना होण्याची समस्या जाणवते. ही समस्या दूर करणे आवश्यक आहे. नाहीतर या या वेदना आणि सूज कालांतराने वाढते. त्यामुळे चालणेही कठीण होते. 


तुमची जीवनशैली आणि आहाराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्यदायी सवयीमुळे तुम्हाला आरोग्य निरोगी राखण्यासाठी मदत मिळेल. बहुतेक आजार हे आपल्या वाईट सवयींमुळे वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास जास्त होत असला, तरी याचा मोसमासोबतच आहारासोबतही विशेष संबंध आहे.


हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास अधिक होतो


संधिवात समस्यांचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये ऑस्टियोआर्थराइटिस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. तसेच, संधिवात आणि सोरायटिक संधिवात या समस्यांना ऑटोइम्यून रोग (Autoimmune disease) स्वयंप्रतिकार रोग म्हटले जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही अन्न आणि पेयांचे सेवन केल्याने संधिवाताची समस्या, सूज आणि वेदना वाढवू शकतात. जर या गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतली नाही आणि याचे सेवन कायम ठेवल्यास संधिवात असलेल्या लोकांची समस्या वाढण्याचा धोका वाढतो. 


'या' पदार्थांचे जास्त सेवन टाळा


यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जेवणात मीठ (Salt) किती आहे याचीही काळजी घ्यावी लागते. संशोधकांच्या मते, उच्च सोडियमयुक्त आहार घेतल्यास संधिवात आणि ऑटोइम्यून रोगांचा धोका वाढू शकतो. सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांकडून आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्याचाही सल्ला दिला जातो.


'या' सवयींमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो


जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल आणि तुम्ही दारूचे सेवन करत असाल तर ते आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. एका संशोधनानुसार, मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये गाउट अटॅकची (Gout Attack) शक्यता आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असते शकते. गाउट अटॅक हा एक प्रकारचा संधिवात आहे. यामध्ये शरीराद्वारे तयार होणारे सोडियम युरेटचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होतात. यामुळे सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तीव्र सांधेदुखी आणि सूज आणि लालसरपणा. 


याशिवाय फास्ट फूड खाणे देखील सांधेदुखीत हानिकारक आहे. बाहेरचे अन्नपदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा. घरगुती सकस आहार घ्या. तळलेले पदार्थ खाणे टाळा. संधिवात आणि सांधेदुखीची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आहार ठरवा. हिवाळ्यात बहुतेक वृद्धांना सांधोदुखीच्या वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना चालताना त्रास सहन करावा लागतो. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची सांधेदुखीची समस्या कमी करता येऊ शकते.


Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.