Air Pollution Side Effect : जगात असंख्य असे देश आहेत जिथे प्रदूषण (Pollution) आहे. असा क्वचितच एखादा देश असेल, जिथे प्रदूषणाची समस्या नाही. वायू प्रदूषण (Air Pollution) ही एक गंभीर समस्या आहे. वायू प्रदूषणामुळे ह्रदय आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो, हे आपल्याला माहित असेल. पण वायू प्रदूषणाचा तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो, असं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. या संशोधनामध्ये वायू प्रदूषणाचा संपूर्ण शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत अभ्यास करण्यात आलं.


मीडिया रिपोर्टनुसार, जनरल फ्रंटियर्स एंड पब्लिक हेल्थमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनात वायू प्रदूषणाचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्याचं सांगितलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे संशोधन जगातील सर्वात मोठं संशोधन असल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनात इंग्लंडमधील 3 लाख 64 हजार लोकांचा समावेश केला होता. अधिक काळ वायू प्रदूषणासोबत संपर्क आल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचं या संशोधनात निरीक्षण करण्यात आलं.


हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक 


वायू प्रदूषणामुळे हवेतील सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साईडमुळे (NO2 - Nitrogen Dioxide) शरीरात जाऊन अनेक समस्या निर्माण होतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे. पार्टिकुलेट मॅटर (PM) मध्ये हवेतील सूक्ष्म कण मोजतात. पीएम 2.5 (PM 2.5) आणि NO2 मुळे मज्जासंस्थेचे विकार, श्वसनसंस्था, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूचे आजार दिसून आलं. यामध्ये नैराश्य, चिंता या समस्यांचा समावेश होता.


आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक


या संशोधनात असं आढळून आलं आहे की, जे लोक जास्त रहदारी असलेल्या भागात राहत होते. तेथे वायू प्रदूषणाची पातळी वाढते. अधिक वायू प्रदूषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यामुळे मृत्यूचा धोका असल्याचं अभ्यासात समोर आलेलं नाही. याबाबत माहिती मिळविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं संशोधकांनी सांगितले. मात्र वायू प्रदूषणामुळे गंभीर आजार होण्याचा धोका बळावतो.


असा काढण्यात आला निष्कर्ष


संशोधकांनी युके बायोबँक के डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये बायोमेडिकल माहिती आणि संशोधन संसाधनांचा समावेश आहे. यामध्ये 40 ते 69 वयोगटातील 1.5 दशलक्ष यूके नागरिकांच्या जेनेटिक्स, जीवनशैली आणि आरोग्यविषयक माहिती समाविष्ट करण्यात आली होती. या तपासणीत वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या 36 शारीरिक आणि पाच मानसिक समस्या समोर आल्या आहेत.


वायू प्रदूषण अधिक असणाऱ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका अधिक असल्याचं या संशोधनात आढळून आलं. यामध्ये गंभीर स्वरुपाचा अस्थमा, हार्ट फेल्युअर तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचंही उघड झालं. या संशोधनााच्या आधारे डॉक्टरांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्क वापरावं आणि स्वच्छ हवेसाठी घर आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक झालं लावावीत.