Health Tips : हिवाळा (Winter-Sesaon) सुरु होताच बाजारात आंबट-गोड चवीची संत्र्यांची (Orange) फळं दिसतात. संत्री खायला जरी चविष्ट असली तरी ती थंड असल्यामुळे अनेकदा संत्री आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक असले तरी ते योग्य वेळी खाणं गरजेचं आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही संत्री किंवा दह्यासारख्या थंड गोष्टी चुकीच्या वेळी खाल्ल्या तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. पण, हिवाळ्यात थंड पदार्थांचं सेवन नेमकं कधी करावं आणि किती प्रमाणात करावं असा अनेकांना प्रश्न पडतो. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आयुर्वेदात काय म्हटलंय?
आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात खूप थंडी असताना संत्री खाणे टाळा. यासाठी सकाळी किंवा रात्री रिकाम्या पोटी संत्री खाऊ नका. हिवाळ्यात तुम्ही दुपारी संत्री, दही खाऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी संत्र्यामुळे ऍसिड रिफ्लॅक्स होऊ शकतो. रिकाम्या पोटी संत्र्याचे सेवन केल्याने दिवसभर छातीत जळजळ, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, रात्री खाल्ल्यास थंडी जाणवू शकते.
डॉक्टर सांगतात की, संत्र्याचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे ते दुपारी खाणे उत्तम आहे. असे केल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही फायदे होतात. खरंतर, व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, संत्र्यामध्ये इतर अनेक घटक असतात. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि कोलेजनचे उत्पादन देखील सुधारते.
नारळ पाणी आणि दही
संत्र्याप्रमाणेच हिवाळ्यात नारळपाणी आणि दही खाण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात दुपारी खाणे उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात बहुतेक जण दही खाणं बंद करतात. कारण, अनेकांचा असा गैरसमज आहे की, दही खाल्ल्याबरोबर शिंका सुरु होतात. पण, आयुर्वेदात असं म्हटलंय की, दह्यासारखे प्रोबायोटिक पदार्थ आपल्या वात दोषाचे संतुलन राखतात.
दही खाल्ल्याने हिवाळ्यातही पोट निरोगी राहते. पोटातील उष्णता शांत राहिल्याने केवळ अपचनच नाही तर त्वचेवर पिंपल्सचा त्रासही होत नाही. म्हणूनच आयुर्वेदात असं म्हटलंय की, दही आणि नारळ पाणी यांसारख्या गोष्टींचे सेवन केलं पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :