Health Tips : बाळंतपणानंतरही काही स्त्रियांना (Women) असामान्य स्थितींना सामोरे जावे लागू शकते. रस्टी पाईप सिंड्रोम (Rusty Pipe Syndrome) हा त्यापैकीच एक आहे. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणजे गंजांच्या रंगाचे कोलोस्ट्रम. प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसात जर आईच्या स्तनातून रक्त किंवा गंजसारखा स्त्राव होत असेल तर त्याला रस्टी पाईप सिंड्रोम म्हणतात. अशा वेळी घाबरू जाऊ नका कारण ही एक निरुपद्रवी स्थिती आहे. परंतु, ही स्थिती नेमकी काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर स्तनपान करणारी माता नक्कीच घाबरून जाऊ शकते आणि ती कदाचित स्तनपान न करण्याचा निर्णय घेऊ शकते. ही स्थिती गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात, विशेषत: दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उद्भवू शकते तसेच, जन्म दिल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत उद्भवू शकते. अशा वेळी 5 ते 7 दिवसांत किंवा प्रसूतीनंतर 10 दिवसांच्या आत समस्या बरी न झाल्यास अतिरिक्त निदान मूल्यांकनाचा सल्ला दिला जातो.


या संदर्भात बोलताना श्रीमती पारुल मुदित मिश्रा, स्तनपान तज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी, पुणे यांनी सांगितलं की, दुधात रक्त आढळून येत असल्याने एक रुग्णाच्या स्तनाची तपासणी करण्यासाठी तिने स्त्रीरोगतज्ञाकडे धाव घेतली. बाळाचे पालक अतिशय चिंतेत होते, कारण त्यांचा पहिला प्रश्न होता हा काही कर्करोग आहे की आणखी काही आजार. बाळाला दूध न देण्याचा सल्ला देत स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्तनपान विशेष तज्ज्ञांची भेट घेण्यास सांगितले. आम्ही तपासले तेव्हा आम्हाला समजले की ते “रस्टी पाईप सिंड्रोम” आहे. सर्वात मोठे काम म्हणजे पालकांना हे पटवून देणे हे होते की यात काहीही चुकीचे नाही आणि अशा वेळी बाळाला स्तनपान करणे सुरक्षित आहे आणि 2 ते 3 आपोआप बरे देखील होईल. काही दिवसांनी आम्हाला फोन आला की प्रकृती ठीक झाली आहे आणि बाळाची तब्येतही बरी आहे. बाळाच्या मलमूत्राचा काही रंग सामान्य झाला होता, जो सिंड्रोमसह सामान्य झाल्याचे आढळले.


रस्टी पाईप सिंड्रोमची लक्षणे कोणती?


ही स्थिती स्तनपानाच्या काही दिवसांतच आपोआप बरी होते. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थितीची मुख्य लक्षणे म्हणजे स्तनपानादरम्यान किंवा गर्भधारणेच्या शेवटी स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे. यामध्ये स्तनाग्रांचे नुकसान होत नाही. स्तनाग्रांना दुखापत झाल्यामुळे हा रक्तस्त्राव होत असल्याचा गैरसमज करुन घेऊ नका. जर स्तनाग्रांवर जखमा असतील तर ते बरे करण्यासाठी त्वरित लक्ष देणं गरजेचे आहे.


अशा वेळी काय केले पाहिजे?


जोपर्यंत रक्तस्राव आढळून आला तोपर्यंत स्तनपान करु नका. अशा वेळी मिल्क बँकच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. स्तनपान करणा-या तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय बाळाचे स्तनपान पूर्णपणे थांबवू नका. रस्टी पाईप सिंड्रोम हे बाळासाठी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करत नाही, काही बाळांना दुधाच्या चवीमुळे दूध देणे टाळले जाऊ शकते, असे झाल्यास तुम्ही बाळाला दूध पाजण्यापूर्वी थोडे काढून टाकू शकता, त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळेल. या परिस्थितीत गोंधळून न जाता नेहमी आपल्या जवळील स्तनपान विशेष तज्ज्ञांची मदत घ्या. स्तनपानादरम्यान आई आणि बाळामधील नातेसंबंध आणखी घट्ट होते हे लक्षात ठेवा.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा