Health Tips : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होतो. यामुळेच थायरॉईडची (Thyroid) समस्या देखील उद्भवते. काही लोकांना आपल्याला थायरॉईडची लागण झाली आहे हे योग्य वेळेत कळतही नाही.  अशा परिस्थितीत थायरॉईडबद्दल जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे. या आजारात वजन कमी होण्याबरोबरच हार्मोन्सचाही त्रास होतो.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेदरम्यान थायरॉईडची समस्या स्त्री आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत महिलांनी काही खास गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 


आहाराची काळजी घ्या


अनेकदा आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेच थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेच्या टप्प्यात असलेल्या महिलांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या महिलेला आधीच हायपरथायरॉईडीझमची समस्या असेल तर तिने कमीत कमी मीठ खावे. तसेच, ज्या भाज्यांमुळे थायरॉईड नियंत्रणात राहील अशा भाज्यांचं सेवन करावं. हायपोथायरॉईडीझमची समस्या असलेल्या महिलेने आयोडीन आणि संपूर्ण धान्य खावे.


रोज योगा करा


योगासने दिर्घकालीन आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. अशा वेळी योगाभ्यास करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. मात्र, यासाठी योग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच योगासने करावीत.


कमी ताण घ्या 


याबरोबरच ताणतणाव शक्यतो कमी करा. तुम्ही जितका जास्त ताण घ्याल तितकी तुमची थायरॉईडची समस्या वाढू शकते. गर्भधारणेदरम्यान थायरॉईडची समस्या सामान्य होऊ शकते, असेही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून न जाता योग्य जीवनशैलीचे पालन करा. तसेच, तणाव कमी घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितका ताण घेणार तितका त्रास तुम्हाला होणार. 


तपासणी करून घ्या


गर्भधारणेदरम्यान थायरॉईडच्या समस्येचे कारण हार्मोनल असंतुलन आहे. यामुळेच अशा वेळी महिलांना समस्यांना सामोरे जावे लागते. जर एखाद्या महिलेला आधीच थायरॉईडचा त्रास असेल तर तिने नियमितपणे स्वतःची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' हंगामी भाज्यांमध्ये दडलाय पोषक तत्त्वांचा खजिना, आजच आहाराचा भाग बनवा; त्वचेसाठीही गुणकारी