Health Tips : आपलं जर पोट ठीक असेल तर आपण निरोगी आहोत हे आपणा सर्वांनाच माहित आहे. कारण बहुतेक आजारांची सुरुवात ही पोट खराब होण्यापासून होते. पण, आज जर आपण 10 पैकी 8 लोकांशी जर बोललो तर आपल्याला कळेल की प्रत्येकजण हा  पचनाच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. जर तुमची पचनशक्ती (Digestive System) चांगली नसेल तर अन्नाचे पचन नीट होत नाही. यामुळे तुम्हाला अपचन, गॅस, उलट्या, पोटदुखी, पोटात सूज यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि जर या सर्वांची वेळीच काळजी घेतली नाही, तर पचनक्रिया खराब झाल्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात.


पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या काही सवयींमुळे आपली पचनसंस्था बिघडते. त्यामुळे या सवयी बदलून आपण आजारांपासून दूर राहू शकतो. कारण नेहमी निरोगी राहायचे असेल तर आपली पचनसंस्था निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे.


आपल्या 'या' सवयींचा पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो


खूप जलद खाणे


काही लोकांना लवकर लवकर जेवण्याची सवय असते. या सवयीमुळे तुम्ही अन्नाचा नीट आस्वाद तर घेऊ शकतच नाहीत पण अन्न नीट चर्वणही करता येत नाही. त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. जेव्हा तुम्ही तुमचे अन्न पूर्णपणे चघळता तेव्हा ते तुमच्या पचनसंस्थेचे काम सोपे करते. त्यामुळे जेवताना अन्न नीट आणि हळूहळू चावा. अन्न संपवण्याची घाई करू नका कारण त्यामुळे अपचन होऊ शकते.


खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करणे 


खरंतर, अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नि तत्व सक्रिय होतात. जे आपले अन्न पचण्यास मदत करतात, म्हणून अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने ही आग शांत होते. त्यामुळे अन्न उशिरा पचते. 


शिळं आणि विरूद्ध अन्न खाणे 


बहुतेक लोक चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये अन्न खातात, हे मिश्रण आपली पचनसंस्था देखील मंदावते. याबरोबरच शिळे अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यालाही नुकसान पोहोचते. यामुळे पचनाचे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे एकाच वेळी हवं तेवढेच अन्न खा.   


अन्नाबरोबर पाणी पिणे 


अन्नाबरोबर जास्त पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती बिघडते. त्यामुळे जेवणाच्या 1/2 तास आधी किंवा नंतरच पाणी प्यावे. जेवताना तहान लागल्यास फक्त 1-2 घोट पाणी प्या.


वेळेवर जेवण न करणे 


बरेच लोक वेळेवर जेवणही करत नाहीत. पण या सवयीमुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवणाची वेळ नेहमी निश्चित ठेवा. तसेच, नाश्ता कधीही वगळू नका. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दररोज ठरलेल्या वेळी करा.


खूप ताण घेणे  


तणावाचा आपल्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यापैकी एक म्हणजे पचनसंस्था. खूप तणावाखाली राहिल्याने पोटात अल्सर, जुलाब आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा, यासाठी तुम्ही योग आणि ध्यान तंत्राची मदत घेऊ शकता.


जास्त खाण्याची सवय


अनेकांना एकाच वेळी भरपूर अन्न खाण्याची सवय असते. ही सवय फार चुकीची आहे. कारण जास्त खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Kids Eyesight : मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे 'ही' कारणे असण्याची शक्यता; चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर