Health Tips : आजकाल जिम किंवा इतर शारीरिक हालचालींद्वारे तंदुरुस्त राहणं हा एक ट्रेंड आहे. तासन् तास घाम गाळून फिट राहण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. पण कधी-कधी जिमला जावंसं वाटत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आळस. एकदा जिमला जाण्याची सवय सुटत राहिली तर फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ लागते. मात्र, घरच्या घरी काही व्यायाम करून सुद्धा तुम्ही फॅट किंवा कॅलरीज बर्न करू शकतात. विशेष म्हणजे असे काही व्यायाम आहेत जे फक्त तुम्ही अंथरूणातच करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला या शारीरिक व्यायामांबद्दल सांगणार आहोत.
लठ्ठपणाची समस्या अनेकांना जाणवतेय
गेल्या काही काळापासून लोकांना वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींनी घेरलं आहे. त्यामुळे झपाट्याने वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. लोक लठ्ठपणाला एक समस्या मानतात तर ती एखाद्या आजारापेक्षा कमी नाही. NCBI (रेफ) च्या अहवालानुसार, लठ्ठपणाचा भारतातील सुमारे 135 दशलक्ष लोकांवर परिणाम होतो. एवढेच नाही तर, संपूर्ण जगात सुमारे 1.9 अब्ज तरुणांचे वजन जास्त आहे आणि 650 दशलक्ष लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. जर तुमच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही अंथरूणावरच काही व्यायाम करून फॅट बर्न करू शकता.
एअर सायकलिंग
अंथरूणावर झोपून तुम्ही एअर सायकलिंग करू शकता, म्हणजे हवेत पाय चालवण्याचा व्यायाम. हा व्यायामाचा प्रकार लहानपणी अनेकजण मज्जा, मस्ती किंवा खेळ म्हणून खेळायचे पण व्यस्त जीवनशैलीत तुम्ही त्याचा वापर अॅक्टिव्हिटी म्हणून करू शकता. यासाठी अंथरूणावर झोपा आणि पाय 90 अंशाच्या कोनात वर करा. दररोज किमान 10 मिनिटे हा व्यायाम करा आणि तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल.
लेग लिफ्ट एक्सरसाईझ
लेग लिफ्ट व्यायामामध्ये, तुम्हाला तुमचे पाय 90 अंशाच्या कोनात उचलून सरळ ठेवावे लागतात. या व्यायामामध्ये तुम्ही भिंतीचीही मदत घेऊ शकता. भिंतीवर पाय ठेवून झोपल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे आपल्या शरीराचा खालचा भाग मजबूत होतो. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ही क्रिया करू शकता. असे केल्याने शरीराला आरामही मिळतो.
बॉडी क्रंच एक्सरसाईझ
पोट, हात आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी बॉडी क्रंच व्यायाम करणे चांगले आहे. हा व्यायाम करण्यासाठी, अंथरूणावर झोपा आणि आपले हात आणि पाय वरच्या दिशेने पसरवा. यानंतर, शरीराला पुश करून गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दररोज साधारण 10 मिनिटे असे केल्याने फॅट बर्न होते आणि अतिरिक्त कॅलरीज देखील कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :