Health Tips : कधी कधी अचानक आपले डोळे फडफडू लागतात. काही वेळा आपण याकडे शुभ-अशुभ या नजरेने पाहतो. मात्र, डोळे फडफडण्याबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. काही म्हणतात, पुरुषाचा उजवा डोळा फडफडणं चांगलं आहे आणि स्त्रीचा डावा डोळा फडफडणं चांगलं आहे. खरंतर, डोळे फडफडणे ही सामान्य समस्या मानली जाते. मात्र, जर तुमचे डोळे वारंवार फडफडत असतील आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरंतर, यामागील मुख्य कारण तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता देखील असू शकते. हाडे मजबूत आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी मॅग्नेशियम हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. मॅग्नेशियम देखील हृदय निरोगी ठेवण्यासाठी एक अतिशय महत्वाचा घटक आहे.


शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोळे फडफडण्या बरोबरच इतरही अनेक समस्या उद्भवतात. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. चला तर मग जाणून घेऊयात शरीरात मॅग्नेशियमची कमतरता कशी ओळखायची.


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोळे का फडफडतात?


खरंतर, मॅग्नेशियम शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि जेव्हा या खनिजाची कमतरता असते तेव्हा स्नायूंचा ताण वाढू शकतो. त्यामुळे डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते.


वारंवार डोकेदुखी होणे


शरीरात आवश्यकतेनुसार मॅग्नेशियमचा पुरवठा झाला नाही तर डोळा फडफडण्या बरोबरच वारंवार डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अशी लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.


भूक न लागणे आणि थकवा जाणवणे


जरी काम केल्यानंतर थकवा जाणवणं ही सामान्य बाब असली तरी, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. याशिवाय भूक लागण्याच्या पद्धतीतही बदल होतो. यामुळे उलट्या होतात, भूक लागत नाही यांसारख्या समस्या निर्माण होतात.


पायात जळजळ होणे


स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी खनिजे आवश्यक असतात, म्हणून जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा पायांमध्ये जळजळ होते आणि पाय मुरगळतो. रात्री झोपताना पाय दुखत असतील तर त्यामागील कारण शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते.


सतत बद्धकोष्ठतेची समस्या जाणवणे


मॅग्नेशियम आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर ते मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


World Spine Day 2023 : दररोज फक्त 15 मिनिटं 'हा' योग करा; पाठदुखीची समस्या कायमची होईल दूर