New Shelters for Indian Soldiers : भारतीय सैन्य (Indian Army) ऊन, वारा असो किंवा पाऊस देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. थंडीची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) हिवाळ्याच्या तयारीत व्यस्त आहे. यावर्षी लडाखमधील कडाक्याच्या थंडीपासून आपले सैनिक, शस्त्रे आणि रणगाडे यांचा बचाव करण्यासाठी भारतीय लष्कराकडून जोरदार तयारी सुरु आहे. सैनिकांना तापमान नियंत्रित शेल्टर्स निवाऱ्यांमध्ये ठेवले जाईल. याशिवाय, विशेष इंधन आणि बॅटरी देखील वापरल्या जातील. यामुळे रणगाड्यांसारखी लष्कराची वाहने सुस्थितीत ठेवता येतील. लडाखमधील नियंत्रण रेषेवरील (LAC) तापमान शून्याच्या खाली गेलं आहे, यामुळे शस्त्रे योग्य पद्धतीने ठेवणं कठीण झालं आहे.


लडाखमधील गोठवणाऱ्या थंडीत बचावासाठी सैन्याचा 'सुपर प्लान'


लडाखच्या धोकादायक थंडीपासून शेकडो रणगाडे आणि इतर यांत्रिक वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी लष्कराकडून तयारी सुरू झाली आहे. मे 2020 मध्ये LAC वर चीनसोबतचा संघर्ष सुरू झाल्यापासून भारतीय लष्कराने लडाखमध्ये आपलं सामर्थ्य वाढवलं आहे. सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले आहे. लष्कराने पूर्व लडाखमध्ये रशियन वंशाच्या T-72 आणि T-90 टँक आणि BMP च्या 400 पेक्षा जास्त किंवा सुमारे तीन ब्रिगेड तैनात केले आहेत. यापूर्वी त्यापैकी फक्त एक तृतीयांश सैनिक येथे तैनात होते.


नवे शेल्टर्स, स्पेशल फ्युएल आणि बॅटरी


लडाख क्षेत्राच रणगाड्यांचा मोठा ताफा व्यवस्थितपणे सांभाळणे हे आव्हान असल्याचे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विशेषत: पूर्व लडाखच्या जे भाग खूप उंचीवर आहेत, तिथे तापमान उणे 30 अंशापर्यंत पोहोचते. दरम्यान, लडाखमधील कोरडे वाळवंट सदृश भूभाग रणगाडे आणि यांत्रिक वाहनांच्या तैनातीसाठी उत्कृष्ट मानला जातो. थंड भागात कमी तापमानामुळे इंधन गोठतं. यामुळेच, यावेळी सैन्याकडून विशेष इंधन वापरलं जात आहे.


सैनिकांसाठी खास निवारे


लडाखच्या कडाक्याच्या थंडीपासून आपल्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी लष्करही कसोशीने प्रयत्न करत आहे. सैनिकांसाठी तापमान नियंत्रण निवारे बांधण्यात आले आहेत. यामध्ये एअर ब्लोअर बसवण्यात आले आहेत. यामुळे निवाऱ्यांमधील तापमान नियंत्रित करता येईल. या आश्रयस्थानांमध्ये संपूर्ण ताफा ठेवता येतो. चीनच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्व लडाखमध्ये 70 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय रणगाडे, तोफखाना, रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत.


रणगाड्यांची काळजी कशी घेतली जात आहे?



  • टँक म्हणजे रणगाड्यांची देखभाल करण्यासाठी, सैन्य लीड-अॅसिड बॅटरीऐवजी लीड टिन बॅटरी वापरत आहे.

  • गोठवणाऱ्या थंडीचा सामना करू शकणारे विशेष इंधन, मल्टीग्रेड वंगण आणि हायड्रॉलिक द्रव रणगाड्यांसाठी वापरलं जात आहेत.

  • लेहच्या आधीच्या भागात दुरुस्ती सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे. कमी ते मध्यम लेव्हलचा बिगाड असल्यास या ठिकाणी रणगाडे आणि इतर वाहनांची दुरुस्ती केली जाऊ शकते.

  • चिलखती वाहनांसाठी उष्णता निवारा तयार करण्यात आला आहे.

  • वाहनांची क्षमता तपासता यावी यासाठी सतत ऑपरेशनल तपासणी आणि कवायती केल्या जात आहेत.