Health Tips : आपली मासिक पाळी नियमित व्हावी असं प्रत्येक महिलेला, मुलीला वाटत असतं. नियमित मासिक पाळी दर 24-35 दिवसांनी येते. त्यामुळे तुमची सायकल 24 दिवसांची असेल, तर त्यामुळे तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा महिन्यातून दोनदा मासिक पाळी येत असेल तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर तुमची सायकल अशी नसेल आणि तरीही तुमची मासिक पाळी महिन्यातून दोनदा येत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. याची अनेक कारणे असू शकतात. ही कारणे नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.
हार्मोनल असंतुलन : इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स तुमच्या मासिक पाळीचे नियमन करतात. त्यांच्या बदलांमुळे पीरियड्स सायकलमध्येही बदल होतात. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. हार्मोनल असंतुलन होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल, गर्भनिरोधक गोळ्या, तणाव इ. या कारणांमुळे हार्मोन्समध्ये होणारे बदल. यामुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते.
थायरॉईड : थायरॉईड ग्रंथीच्या समस्येमुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते. थायरॉईड ग्रंथीद्वारे संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये बदल झाल्यामुळे पीरियड्स सायकलमध्ये बदल होतात. ज्या महिलांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांची मासिक पाळी अनियमित असते. त्यामुळे वेळीच थायरॉईडची तपासणी करा.
प्री मेनोपॉज : ही रजोनिवृत्तीपूर्वीची स्थिती आहे आणि बहुतेकदा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये आढळते. या काळात शरीरात हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे तुमची मासिक पाळी महिन्यातून दोनदा येऊ शकते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि काही गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या रजोनिवृत्तीची लक्षणे दूर करू शकता.
PCOS : यामध्ये तुमच्या गर्भाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होते. यामध्ये तुमचे हार्मोन्स असंतुलित होतात. यामुळे, तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो आणि हे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याचे कारण असू शकते. त्यामुळे, जर तुमच्यासोबत असे होत असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि PCOS साठी चाचणी करा.
तणाव : आपल्या रोजच्या धावपळीत तणावाचा सामना प्रत्येकाला करावा लागतोय. यामुळे देखील तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात आणि त्यामुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते. सुरुवातीला हा त्रास जरी 1-2 वेळा येत असला तरी वारंवार ही समस्या जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :