Health Tips : ऑफिसमध्ये कामाच्या दरम्यान तसेच मीटिंगमध्ये असताना अनेकदा खाण्याकडे (Food) लक्ष जात नाही. किंवा वेळ देता येत नाही. यामुळे अनेकदा दुपारचं जेवण किंवा सकाळचा नाश्ता स्किप करावा लागतो. काही दिवसांसाठी नाश्ता स्किप केला तर ठिक आहे. पण, जर रोज ही सवय असेल तर याचा तुमच्या आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो. तसेच, यामुळे तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो.
आपल्या शरीराला दिवसभर सक्रिय ठेवण्यासाठी त्याला पुरेसा आणि संतुलित आहार देणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण शरीराला झटपट ऊर्जा देणारे असे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत. हे पदार्थ कामाच्या दरम्यान जेवायला वेळ मिळत नसेल तर तेव्हाही तुम्ही खाऊ शकता आणि तुमचा अशक्तपणा दूर करू शकता.
सफरचंद
सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. सफरचंद खाल्ल्याने अनेक रोगांचा धोका टाळता येतो. सफरचंद खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ऊर्जाही मिळते.
केळी
केळी जीवनसत्त्वे, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत मानली जातात. याशिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही असतात. केळी हे पूर्ण अन्न मानले जाते. दोन ते तीन केळी खाल्ल्याने पोट तर भरतेच पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते.
तूप
जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. पण, मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तूप खाणे फायदेशीर आहे. मात्र, तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
मनुका
सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात. याचा अर्थ, जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात खा. उर्जेसाठी मनुके नक्कीच खा.
तुळस
पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकवा जाणवत असेल आणि त्यामुळे काम करावंसं वाटत नसेल, तर तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने ही तक्रार दूर करू शकता. तुळशीची पाने चहा किंवा पाण्यात उकळून प्यायल्याने अशक्तपणा, थकवा दूर होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
डाळिंब
आपल्याला झटपट ऊर्जा देणाऱ्या फळांमध्ये डाळिंबाचाही समावेश होतो. खरंतर, शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येतो आणि डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे या दोन्ही समस्या दूर होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' चांगल्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात; आजपासूनच त्या बंद करा