Petrol Diesel Price : सध्या देशात महागाई (inflation) वाढत आहे. या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. महागाई वाढू नये यासाठी सरकारनं विविध पिकांच्या निर्यातीवर बंदी (Ban on export) घातली आहे. अशातच आता पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घसरण होणार का?  असा सवाल उपस्थित केला जातोय.  महागाईचा आकडा चार महिन्यांतील उच्चांक 5.69 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही महागाई मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरपेक्षा कमी झाली होती. भारतीय बास्केटची किंमत देखील बर्‍याच काळापासून प्रति बॅरल 80 डॉलरपेक्षा कमी दिसत आहे. अशा परिस्थितीत देशातील मोदी (PM Modi) सरकार उन्हाळ्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारतीय ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची शक्यता आहे. महागाई अटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या डिसेंबरमध्ये महागाईचा आकडा चार महिन्यांतील उच्चांकी 5.69 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही महागाई मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. तसेच अनेक उत्पादनांना स्टोरेजची बंधने घालण्यात आली आहेत.


तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होण्याची शक्यता


इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जागतिक तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे निवडणुकांनंतर देशात मे 2024 पर्यंत सरकार स्थापन होईल. नवीन सरकारला पुढील 12 महिने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी कमी करण्याची शक्यता आहे. 


तेल विपणन कंपन्या नफ्यात


तेल विपणन कंपन्या नफ्यात येण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आहे. लिबिया आणि नॉर्वेमध्ये मागणी कमी झाल्यानं आणि उत्पादनात वाढ झाल्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. मध्यपूर्वेतील तणावामुळं या घटकांनी काही प्रमाणात संभाव्य चलनवाढ नियंत्रणात ठेवली आहे.


रशियाकडून कच्च्या तेलाची मोठ्या सवलतीत आयात 


आतापर्यंत भारत रशियाकडून कच्च्या तेलाची मोठ्या सवलतीत आयात करत होता. आता ही सवलत प्रति बॅरल फक्त 2 डॉलरवर आली आहे. पण, भारताकडे रशियापेक्षा स्वस्त कच्च्या तेलाचा पर्याय आहे. व्हेनेझुएलाकडून भारताला प्रति बॅरल 8 ते 10 डॉलरच्या सवलतीत कच्चे तेल मिळण्याची अपेक्षा आहे. व्हेनेझुएला कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकचा सदस्य आहे. दुसरी बाब म्हणजे भारत 80 टक्के कच्चं तेल आयात करतो. सध्या जगातील सर्वात मोठा तेलसाठा व्हेनेझुएला येथे आहे. त्यामुळे व्हेनेझुएलातून स्वस्त तेल उपलब्ध झाल्यास बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरतील. त्याचा फायदा भारतीय रिफायनरींना होईल, त्यामुळं पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होईल.


महत्त्वाच्या बातम्या:


Petrol Diesel Price : निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार?