Health Tips : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि कामाचा वाढता ताण यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे फास्ट फूडचं सेवन, मानसिक ताण, अपुरी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव ही यामागे प्रामुख्याने कारणं आहेत. तरुण वयात लोकांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. अशा स्थितीत आयुर्वेदानुसार या नियमांचा वापर केल्यास हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.
संतुलित अन्न
संतुलित अन्न हृदयाला निरोगी ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आयुर्वेदानुसार, आपण आपल्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि काजू यांसारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे. या सर्व गोष्टींमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच, अतिरिक्त फॅट, मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे कारण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
व्यायाम आणि योग
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आणि व्यायाम खूप महत्वाचे आहेत. आयुर्वेदातही यावर जोर देण्यात आला आहे. दररोज काही वेळ व्यायाम आणि योगासने केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात. हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे कमी वयात हृदयविकाराचा धोका कमी होतो. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, प्राणायाम यांसारखे उपक्रम हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. दैनंदिन दिनचर्येत त्यांचा समावेश केला पाहिजे.
तणाव घेऊ नका
चिंता, भीती, नैराश्य यांसारख्या भावना हृदयाचे ठोके जलद करतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आयुर्वेदात या नकारात्मक भावना टाळून मानसिक शांतता राखण्यावर भर देण्यात आला आहे. दररोज ध्यान आणि योगासने केल्याने मनाला शांती मिळते. याशिवाय कुटुंब, आणि मित्रांबरोबर सकारात्मक वेळ घालवल्याने तणाव दूर राहतो.
आयुर्वेदानुसार तुम्ही जर या गोष्टी पाळल्या तर हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकता. यासाठी तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.