Health Tips : मधुमेह (Diabetes) हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या तीव्र आजारांपैकी एक आहे. सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. मधुमेहाचा आजार हा पूर्वी फक्त वृद्धांमध्येच आढळून यायचा मात्र, आता या आजाराचं प्रमाण आता तरूणांमध्येही दिसू लागलं आहे. मधुमेह झालेल्या रूग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांना साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते आणि त्यांची समस्या गंभीर होऊ शकते. पण, तुम्हाला माहित आहे का, केवळ साखरच (Sugar) नाही तर मीठ (Salt) खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेच्या टुलेन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, जेवण करताना मीठ घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. या अभ्यासात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. 
 
नवीन अभ्यासात काय म्हटलंय? 


जर्नल मेयो क्लिनिक प्रोसीडिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 400,000 हून अधिक प्रौढांच्या दैनंदिन खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांच्या मीठ खाण्याच्या पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला. साधारण साडे अकरा वर्षांच्या फॉलोअपमध्ये, टाइप 2 मधुमेहाची प्रकरणे सुमारे 13 हजार लोकांमध्ये आढळली आहेत. कमी मीठ खाणाऱ्यांच्या तुलनेत, नेहमी मिठाचं सेवन करणाऱ्यांमध्ये टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 39 टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे.
 
मीठ खाल्ल्याने 'या' आजारांचा धोका जास्त असतो


या संदर्भात टुलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रोफेसर आणि प्रमुख लेखक डॉ. लू क्यूई म्हणाले, 'आम्हा सर्वांना माहित आहे की, जास्त मिठाचं सेवन हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. या नवीन अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने केवळ मधुमेहच नाही तर इतर अनेक आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. यासाठीच जर मधुमेह टाळायचा असेल तर केवळ साखरेचं सेवन कमी करून चालणार नाही तर मिठाचं देखील सेवन कमी करणं गरजेचं आहे. 
 
जास्त मीठ खाल्ल्याने होणारे आजार


1. लठ्ठपणा वाढतो
2. शरीरात सूज येणे
3. हाडांमध्ये कमकुवतपणा जाणवणे


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : फक्त चॉकलेट्स आणि मिठाईच नाही तर रोज खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमध्येही असते शुगर; वेळीच सावध व्हा